पंढरपूर : येथील ऍपेक्स हॉस्पिटलमध्ये तपासणी केलेल्या एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे हॉस्पिटलमधील स्टाफला हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी काहींना त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, असे सांगण्यात आल्याने त्या व्यक्ती घरी परतल्या आणि त्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे कमालीचा गोंधळ उडाला आहे.
या प्रकाराची समजलेली माहिती अशी, की येथील ऍपेक्स हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे दक्षता म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलमधील स्टाफला हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती हॉस्पिटलच्या प्रशासनाला मिळाल्यामुळे क्वारंटाईन कालावधी संपण्यापूर्वीच स्टाफमधील कर्मचाऱ्यांना आपापल्या घरी जाण्यास सांगण्यात आले. त्यापैकी दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती काही कालावधीनंतर पुढे आली. परंतु, तोपर्यंत रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती मिळाल्यामुळे संबंधित कर्मचारी घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना भेटले आणि परिसरातही फिरले. संबंधित काही कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा त्यांना वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले. या सावळ्या गोंधळामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि परिसरातील नागरिकांना कमालीचा मानसिक त्रास झाला. पालिका प्रशासनाने पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या कर्मचाऱ्यांच्या घराचा परिसर तातडीने सील केला. याप्रकरणी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात हॉस्पिटलचे प्रशासन विभागप्रमुख डॉ. आरिफ बोहरी यांना विचारले असता ते म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले नव्हते. गैरसमजातून हा प्रकार घडला आहे.