ऊर्जामंत्री पोहोचले ग्राउंड झिरोवर, अधिकाऱ्यांना धरले चांगलेच धारेवर

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : मुंबईची आयलँडिंग यंत्रणा 12 ऑक्टोबरला कार्यान्वित न झाल्याने वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली (SLDC) येथे नितीन राऊत यांनी सोमवारी भेट दिली. या केंद्राचे कामकाज कसं चालतं, याची ऊर्जामंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळेस टाटा वीज कंपनीचे अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबई आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे आणि 12 ऑक्टोबरला नेमकं काय घडलं याबद्दल सादरीकरण केलं.

मुंबईचे आयलँडिंग करणे आणि बाहेरून मुंबईला होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करणे, ही जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही तुमच्या झालेल्या चुका लपवत आहात काय? चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा! जर मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का?, असा सवाल देखील ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.

घातपात असण्याच्या वक्तव्यावर ऊर्जामंत्री ठाम

12 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात असण्याच्या वक्तव्यावर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत हे ठाम आहेत. याबाबत राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे.

चौकशी अंती चित्र स्पष्ट होईल, असं नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं.

ऊर्जामंत्र्यांनी सोमवारी नवी मुंबईतील एसएलडीसी केंद्राला भेट दिली. यावेळी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज असल्याचे सांगितले. वीज बिल कमी करण्याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं राऊत यांनी सांगितले.

या बैठकीला ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महापारेषण संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *