वाळवंटातली गाढवं निघाली उटीला! वाळूमाफियांना पोलिसांचा असाही दणका

क्राईम ताज्या घडामोडी पंढरपूर

चंद्रभागेच्या वाळवंटात रोज लाखो रुपये किमतीचा बेकायदा वाळू उपसा होत असतो. या उपशानंतर वाळू वाहतुकीसाठी या गाढवांचा वापर केला जातो.

Pandharpur Sand Mafia action Taken By Police donkey donkey went to Ooty

पंढरपूर : पुढे एक पोलीस गाडी, मागे एक पोलीस गाडी आणि मध्ये दोन टेम्पो असा लवाजमा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून बाहेर पडला आणि पाहणाऱ्याला वाटले कि यात खूप काहीतरी मौल्यवान सामान आहे. ज्याच्यासाठी हा पोलीस बंदोबस्ताचा एस्कॉर्ट आहे . मात्र यातून चक्क गाढवं थंड हवेचं ठिकाण असलेल्या उटीला निघालेली असून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा अर्थात पुन्हा एखाद्या वाळू माफियांना त्यांना गाडीतून उतरवून बेकायदा वाळू उपशाला जोडू नये यासाठी पोलीस गाडीत चक्क हत्यारबंद पोलिसांच्या उपस्थितीत गाढवांचा हा प्रवास उटीकडे सुरु झाला आहे .

अवघ्या राज्याला पूज्य असलेल्या चंद्रभागेच्या वाळवंटात रोज लाखो रुपये किमतीचा बेकायदा वाळू उपसा होत असतो. या उपशानंतर वाळू वाहतुकीसाठी या गाढवांचा वापर केला जातो. दिवसभर गावभर फिरणारी हे गाढवं सायंकाळी त्यांचे मालक एकत्र गोळा करतात आणि रात्री या गाढवांना चंद्रभागा वाळवंटात सोडून त्यांच्या पाठीवर रात्रभर वाळू उपसा केला जातो. पोलीस छापा टाकायला आल्यावर हे वाळू माफिया गाढवं सोडून पळून जातात. पोलिसांच्या हाती केवळ पाठीवर वाळू भरलेले गाढवंच हाती लागत.

बेसुमार वाळू उपशामुळं चंद्रभागेचं वाळवंट अक्षरश: उध्वस्त होऊन गेले असून वाळवंटातील मंदिरे आणि संतांच्या समाध्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. यावर एबीपी माझाने आवाज उठवल्यावर पोलिसांनी हालचालीस सुरुवात केली आहे. या गाढवांना पकडून कोर्टातून आदेश मिळेपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात हिरवा चारा देऊन सांभाळायची जबाबदारी पोलिसांवर यायची. ज्याची गाढवे असतील तो गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने पोलिसात फिरकतच नसे. अखेर पोलिसांनी यावर नामी तोडगा शोधात सांगली येथील राहत या संस्थेशी संपर्क करून या गाढवांना सांभाळायला द्यायचा निर्णय घेतला.

चार दिवसापासून पोलीस ठाण्यात असलेल्या या 36 गाढवांची डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर राहत या संस्थेमार्फत या गाढवांना कोर्टाच्या आदेशानंतर दोन टेम्पो मध्ये भरण्यात आले. प्रवासात खाण्यासाठी त्यांना भरपूर हिरवा चारा सोबत घेण्यात आला आणि पोलिसांच्या बंदोबस्तात अखेर या गाढवांचा थंड हवेचे ठिकाण असलेल्या उटीकडचा प्रवास सुरु झाला. आता अशा पद्धतीने वाळू उपसा करणारी गाढवे सापडताच गाढव मालकांवर कायदेशीर कारवाई करून या गाढवांची रवानगी उटीकडे केली जाणार आहे. गेले चार दिवस गाढवे सांभाळून वैतागलेल्या पोलिसांनीही या गाढवांना उटीला पाठवतात सुटकेचा निश्वास सोडला तर रात्रभर वाळू वाहून वैतागलेल्या गाढवांनीही हिरवा लुसलुशीत चारा खात आपला थंड हवेच्या उटी कडाचा प्रवास सुरु केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *