ट्रम्प तात्यांना निवडणूक जड जाणार

ताज्या घडामोडी देशविदेश लेख

    अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होऊ घातली आहे. अमेरिकेत सध्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. केवळ अमेरिकेचेक  नव्हे तर जगाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काय होईल? ते पुन्हा निवडणूक येतील की पराभूत होतील? याची चर्चा जगभर सुरु  आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे ही निवडणूक सहज जिंकतील अशी स्थिती होती. पण कोरोना आला आणि दुर्दैवाने फासे त्यांच्या उलटे पडले. अमेरिकेत कोरोनाचा कहर जसा वाढत गेला तशा  ट्रम्प यांच्या समस्या वाढत गेल्या. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प प्रशासन अपयशी ठरल्याने अमेरिकन जनतेची ट्रम्प यांच्याविषयी नाराजी वाढत गेली. कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात ट्रम्प यांच्या उलटसुलट विधानांनी त्यात भरच पडली.  कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसत गेली. या परिस्थितीचा सामना करताना ट्रम्प यांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे तरीही ट्रम्प यांनी चिकाटी सोडली नाही ते त्यांचे विरोधक जो बिडेन यांच्या  विरोधात तुटून पडत आहे. तरीही सध्यस्थीतीत डोनाल्ड ट्रम्प जो बिडेन यांच्यापेक्षा मागे पडत चालले आहे. जो बिडेन यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिमी कार्टर, बिल क्लिंटन व बराक ओबामा हे तीन माजी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या पाठीशी असून ते उघडपणे बिडेन यांचा प्रचार करीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भर भारतीय मतदारांवर होता या मतांवर डोळा ठेवूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून हाऊ डी मोदी हा कार्यक्रम घेतला. नरेंद्र मोदी यांनी अब की बार ट्रम्प सरकार म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवला. भारतीय मतदारांची मते आपल्या पारड्यात पडतील अशा अविर्भावात असणाऱ्या ट्रम्प यांना जो बिडेन यांनी  झटका देत कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेला उपाध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. जो बिडेन यांच्या खेळीने ट्रम्प यांना चांगलाच झटका बसला आहे. कारण कमला हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे ट्रम्प यांना मिळणारी भारतीय मते विभागली जाणार आहे. सगळेच फासे उलट पडत चाललेल्या ट्रम्प यांना त्यांच्या घरातूनही विरोध होऊ लागला आहे. ट्रम्प यांच्या पुतनीने ट्रम्प यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन बिडेन यांचे समर्थन केले आहे. ट्रम्प यांची सख्खी थोरली बहीण, माजी फेडरल न्यायाधीश मरियम ट्रम्प यांनीही आपला भाऊ तत्वहीन, अखंड बडबड करणारा आणि खोटारडा आहे असे म्हटले आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सख्ख्या थोरल्या बहिणीने ट्रम्प यांना अशी ओवाळणी दिल्याने ट्रम्प यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.अर्थात  ट्रम्प यांचा खोटारडेपणा जगजाहीर आहे. मूळ मुद्द्याला सोडून नको त्या मुद्द्यांवर चर्चा करुन जनतेला मूर्ख बनवायचे हे ट्रम्प यांचे धोरण आता त्यांच्याच अंगलट आले आहे. त्यामुळेच जो बिडेन यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद वाढत चालला आहे. अमेरिकन प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना जवळपास सर्व प्रमुख राज्यांमध्ये ट्रम्प यांच्यावर आघाडी मिळाली आहे. एकूणच डोनाल्ड  ट्रम्प यांच्याविषयी अमेरीकन जनतेचे मत पालटत आहे. ही  स्थिती अशीच कायम राहिली तर डोनाल्ड ट्रम्प यांचे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेचे बनायचे स्वप्न स्वप्नच राहील.

श्याम बसप्पा ठाणेदार दौंड जिल्हा ,पुणे ९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *