देहविक्री करणाऱ्या महिलांवर उपासमारीचे संकट

सोलापूर

सोलापूर ( प्रतिनिधी): गेल्या तीन महिन्यांमध्ये कोरोना विषाणूने भारतामध्ये देखील आपली पाळेमुळे घट्ट केले. बघता बघता अनेक जण या संसर्गाने बाधित झाले तर अनेक जण मृत्युमुखी पडले. संसर्गाने बाधा थांबावी आणि  माणसे मृत्युमुखी पडू नयेत यासाठी देशामध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदी मुळे देशातील अनेक गरीब जनतेची उपासमार झाली परिणामी अनेक व्यक्ती उपासमारीने मृत्युमुखी देखील पडले.समाजातील अत्यंत उपेक्षित घटक म्हणजेच प्रॉस्टिट्यूट अर्थात देहविक्रय करणाऱ्या महिलाही त्यातून सुटल्या नाहीत. स्त्री लज्जा बाजूला सारून ग्राहक मिळवण्यासाठी एरव्ही रस्त्यावर येऊन आटापिटा करणाऱ्या या महिलांच्या व्यवसायाला कोरोना महामारीच्या या संकटामुळे जणू ग्रहणच लागलं. संचारबंदी जिल्हाबंदी अशा कारणाने त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांचे प्रमाण शून्य झालं व परिणामी त्यांच्यावर सध्या उपासमारीचे संकट कोसळलेला आहे. मद्यपान करणे, धुम्रपान करणे अशा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या आणि त्यांच्या ग्राहकांना नेहमीच अरेरावी आणि अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या या महिलांचे भयाण व अंधकारमय जीवन सध्या सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे. कोणत्याही परपुरुषाशी शरीरसंबंध हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या महिला सध्या जीवनाशी संघर्ष करत आहेत. गेले दोन ते तीन महिने देशामध्ये टाळेबंदी लागू करण्यात आल्याने यांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे. त्यामुळे या महिलांना पोटाची खळगी भरणे सुद्धा अत्यंत जिकिरीचे झालेला आहे. ग्राहकच नाही तर पैसे मिळणार कुठून असा प्रश्न या महिला थेट सरकारला विचारत आहेत परंतु मायबाप सरकार यांचा यत्किंचितही सध्या विचार करताना दिसत नाही. घरभाडे, लाईट बिल भरणे तर लांबची गोष्ट साधं जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी पैसे नसल्याकारणाने या महिला सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात असल्याचे चित्र आहे. थकित घरभाडे न भरल्यामुळे घर मालकांनी जर घराबाहेर काढलं तर आपण जावे कुठे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. या वेश्यांची मुलंही आहेत परंतु पैसाच नसल्याने त्यांना जगवायचं कसं हा प्रश्न त्यांना नित्याने सतावतो आहे.समाज यांच्याकडे अत्यंत तिरस्काराने आणि नकारात्मक दृष्टिकोनातून बघतो अशा या वेश्या सध्या अत्यंत भयानक जीवन जगत असल्याचे निदर्शनास आलेला आहे. केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर पाश्चात्त्य देशामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या सर्वच महिलांची हीच व्यथा आहे. टाळेबंदीमुळे कोरोनापासून निश्चितपणे वाचू परंतु टाळेबंदी अधिक ताणली गेली तर उपासमारीने देखील आपण दगावू शकतो  ही अनाठायी भीती त्यांच्या मनात सध्या घर करत आहे.या देहविक्रय करणाऱ्या  महिलांचं सरकारने पुनर्वसन करण्याची गरज असून त्यांना तातडीने सरकारनीं.. समाजातील दानशूर संस्थांनी वेळेत मदत करण्याची सध्या आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *