दूध दरासंदर्भात स्वाभिमानी पुन्हा आक्रमक, सोलापुरात मोर्चा

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : दुधाला वाढीव अनुदान आणि दर देण्याची मागणी घेऊन स्वाभीमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली. सोलापुरात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. जनावरे, बैलगाडी, ट्रक्टर इत्यादीसह शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि सोलापुरच्या आसपासच्या जिल्हातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. दुपारी 12.30 च्या सुमारास सोलापुरातील चार हुतात्मांना अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा गेला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.

गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळावे, प्रति लिटर 25 रुपये दर मिळवा, केंद्र सरकारने दूध पावडर आयतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकऱी संघटनेचे अध्यक्ष चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “मागील दोन महिन्यांपासून आम्ही दुधाला भाव मागतोय मात्र दुधाला भाव मिळत नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारने आयात करण्याचा निर्णय रद्द करावा तसेच निर्य़ातीवर सबसिडी द्यावी. दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावी. राज्यसरकारने तात्पुरती उपाययोजना म्हणून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे अनुदान जमा करावे”, अशी मागणी असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. मात्र शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्यांने घेत नसल्याने रस्त्यावर उतरावं लागत असल्याची टीका देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केली.

यावेळी राजू शेट्टी यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. ‘2007 साली अशाच पद्धतीने मी दुधाचं आंदोलन सुरु केलं होतं. मुंबईला जाणारं दुध मी रोखून धरलं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अमेरिकेत होते. त्यावेळी विलासराव यांनी अमेरिकेतून फोन केला होता. त्यानंतर आर. आर. आबा यांच्यासोबत चर्चा झाली. या आंदोलनानंतर दुधाचं भाव वाढवून देखील देण्यात आला होता. कारण ती मातीतून आलेली माणसं होती, तळागळातून आलेली माणसं होती. त्यामुळे त्यांनी दुधाचा दर वाढवून दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाहीये. उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संवाद होत नाहीये. पत्रव्यवहार केल्यानंतर केवळ पत्र पोहोचलं आहे इतकेच उत्तर प्राप्त झाल्याची माहिती यावेळी माझाशी बोलताना राजू शेट्टी यांनी दिली.

20 ऑगस्ट रोजी नगरला दुधदरवाढ संदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 23 ऑगस्ट रोजी साताऱ्यात देखील मोर्च्याचे नियोजन करण्यात आले असून आम्ही शासनाला हैराण करुन सोडणार असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *