‘ढोल बजाओ..सरकार जगाओ!’ आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई: एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजानं शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे. राज्यभरात धनगर समाजाचा एल्गार पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ अशा घोषणा देत आंदोलन केले जात आहे.सोलापूर जिल्ह्यात ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे. धनगरी ढोल वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माळशिरस येथे सकाळी धनगर समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्याप्रमाणे पंढरपुरात देखील धनगर समाज बांधवांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये ‘ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन’ होत आहे. सोलापूर  जिल्ह्यातील विविध भागातून धनगर समाजाचे बांधव ढोल वाजवत आंदोलन स्थळाकडे येऊ लागले आहेत. भंडाऱ्याची उधळण करत आणि धनगरी नृत्य करत सर्व धनगर बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.

पंढरपूर येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजावो आंदोलन स्थळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर दाखल झाले आहेत. धनगर आरक्षणासाठी पंढरपूरातून धनगर बांधव जमू लागले आहेत. धनगरी ढोलचा आवाज पिवळ्याधमक भंडाऱ्याची उधळण आणि नृत्य असा सगळा माहोल पंढरपूरात दिसत आहे.

जे आदिवासींना तेच धनगरांना

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातही आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. जे आदिवासींना तेच धनगरांना, अशी घोषणा देत ढोलताशे धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. नांदगावला तहसील कार्यलायवर मोर्चा काढून ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाला आरक्षण देऊन तसा अध्यादेश काढण्यात यावा, या मागणीसाठी धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी तहसीलदाराना एक निवेदन ही देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *