सोलापुरात 3 लाख 81 हजार हेक्टरचे नुकसान

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. ज्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 81 हजार 462 हेक्टरचे नुकसान झाले आहे. ज्याचा थेट फटका जवळपास 3 लाख 95 हजार 19 शेतकऱ्यांना बसला आहे. या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 482 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यात जवळपास 3 लाख 13 हजार 803 हेक्टर बागायत आणि जिरायत क्षेत्र बाधित झाले आहे. तर 67 हजार हेक्टर फळपीक क्षेत्रास अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बागायत आणि जिरायत पीक क्षेत्राला 10 हजार रुपये तर फळपिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलीय. राज्य शासनाने जाहिर केलेल्या निकषांनुसार 482 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.एनडीआरएफच्या नियमांनुसार पुरग्रस्तांसाठी केंद्रशासनाकडून देखील मदत मिळत असते. केंद्राच्या नियमांनुसार जिरायत आणि बागायत जमीनीसाठी 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टर तर फळपिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळते. केंद्राच्या या निकषानुसार जिल्ह्यातील बाधित क्षेत्रासाठी 335 कोटी रुपयांची मदत मिळू शकते. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवला जाईल.

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे बार्शी तालुक्यात झाले आहे. एकट्या बार्शी तालुक्यात 68 हजार 868 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यांनतर पंढरपूर तालुक्यात 65 हजार हेक्टर, अक्कलकोट तालुक्यात 43 हजार 524 हेक्टर, सांगोला 26 हजार 766 हेक्टर, माढा 43 हजार 912 हेक्टर, मोहोळ 27 हजार 136 हेक्टर, मंगळवेढा 31 हजार 503 हेक्टर, माळशिरस 16 हजार 16909 हेक्टर, दक्षिण सोलापूर 21 हजार 600 हेक्टर, उत्तर सोलापूर 18 हजार 12 हेक्टर तर करमाळ्यात देखील 18 हजार 230 हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *