पंढरीतील आरोपीचे सिनेस्टाईल पलायन: खुनाच्या गुन्ह्यात होता अटकेत

क्राईम पंढरपूर

पंढरपूर (सोलापूर) : खुनाच्या आरोपाखाली येथील सबजेलमध्ये अटकेत असलेला आरोपी कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने उपचारासाठी आणले असता पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा प्रकार काल सकाळी सहाच्या सुमारास पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिवाजी नाथाजी भोसले (रा. तिसंगी,ता.पंढरपूर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 

शिवाजी भोसले याला चार वर्षांपूर्वी २०१६  मध्ये पत्नीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.त्याला सध्या पंढरपूर  येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी (ता. 11) त्याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

काल सकाळी सहाच्या सुमारास  तो रुग्णालयाच्या शौचालयात शौचविधीसाठी गेला होता.दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून शौचालयाची खिडकी तोडून तो पळून गेला.बराच वेळ झाला तरी आरोपी बाहेर न आल्याने चौकशी केली असता हा प्रकार काही वेळाने पोलिसांच्या लक्षात आला.

रुग्णालयाच्या आवारात त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.मात्र खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी भल्या सकाळी पळून गेल्याने त्याला कोरोनासदृश लक्षणे दिसून आल्याने त्याचा शोध घेताना मात्र पोलिसांची झोप उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कालपासून पंढरपूर येथील पंढरपूर शहर,तालुका व ग्रामीण अशा तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी आरोपीच्या शोधात फिरताना दिसले.याचबरोबर आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पाटलांची मदत पोलीसांकडून घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *