क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मळणी यंत्रात केस अडकून महिलेचं डोकं धडावेगळं

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

पंढरपूर : सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील पोथरे याठिकाणी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील भयंकर बाब म्हणजे या महिलेचा मृत्यू मळणी यंत्रात अडकून झाला आहे. महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी ही घटना घडली.

उषा पंडित झिंजाडे असं या मृत महिलेचं नाव आहे. शिवारात काम करत असताना ही घटना घडली. ज्याठिकाणी ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जोडले जाते त्याठिकाणी उषा झिंजाडे यांचे केस अडकले. त्यानंतर त्यांचे केस यामध्ये गुरफटून डोकं या यंत्रामध्ये अडकलं. ही घटना इतकी भयंकर होती की त्यानंतर उषा यांचं डोकं शरीरापासून वेगळं झालं आणि त्यांचा मृत्यू झाला. आजुबाजूच्यांना काही समजण्याच्या आतमध्येच त्यांनी प्राण गमावले होते.

सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. अनेक गावागावांत शेतीची काम सुरू आहे. झिंजाडे कुटुंबीय देखील कामात व्यस्त असताना ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा महिलेचे पति पंडित झिंजाडे आणि मुलगा अनिकेत तिथेच उपस्थित होते. ज्वारीची मळणी करत असताना ही घटना घडली. इतक्या त्वरित हा सर्व प्रकार झाला की नवरा आणि मुलगाही काही करू शकले नाहीत. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

चिपळूणमध्येही दोन दिवसापूर्वी घडली होती अशीच घटना

चिपळूण येथील पेढांबे इथं सिमेंट मिक्सर प्लॅन्टमधील मिक्सरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचा मिक्सरमध्ये तोल जाऊन जागीच मृत्यू झाला. 25 फेब्रुवारीला ही घटना घडली. मृत कर्मचारी हा कोलकाता येथील रहिवासी असून त्याचे वय 28 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. गुहागर विजापूर महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मनिषा कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा ठेका घेतला असून यांचा कर्मचारी आज सकाळी नेहमी प्रमाणे कामावर रुजू झाला होता. आज दुपारच्या सुमारास सिमेंट मिक्सरमध्ये काहीतरी अडकले असल्याचे लक्षात आल्यानंतर तो कचरा काढण्यासाठी हातोडा घेऊन गेला. मात्र पुढे विपरीत घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *