पंढरपुरात चोराची भन्नाट शक्कल! नारळाच्या झाडावरुन माडीवर उतरत करायचा चोरी

क्राईम ताज्या घडामोडी पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

घटनास्थळी घराचे कुलूप अथवा घराची कडी तुटली नसल्याने घरामध्ये प्रवेश करणारा व्यक्ती हा ओळखीचा अथवा घरात येणारा जाणारा असल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. त्यानुसार तपास करताना फडे यांच्या घरी सफाईला येणाऱ्या राहुल पवार यास ताब्यात घेवून चौकशी केली असता या चोरीचा उलघडा झाला.

हा राहुल पवार वेळोवेळी बंगल्यातील नारळाच्या झाडावरून दुसऱ्या मजल्यावर उतरत व बेडमध्ये लपवून ठेवलेले दागिने व रोकड लांबवत होता. या आरोपीकडे तपास केला असता 9 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 28 तोळे सोन्याचे दागिने, 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची 3 किलो 500 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, पितळ धातूच्या भांडी व 500 रुपये किंमतीचा जुना बंद मोबाईल असा असलेला एकूण 11 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *