1 कोटी रुपयांच्या विमा रकमेपोटी पत्नीकडूनच पतीच्या खुनासाठी मदत

ताज्या घडामोडी देशविदेश

लातूर : गुन्हा आज ना उद्या उघड होत असतो याची प्रचिती लातूर जिल्ह्यातील एका खुनाच्या घटनेतून समोर आली आहे . तब्बल एक कोटीच्या विम्याच्या रकमेसाठी खून झाल्याची घटना लातूरमध्ये घडली होती. त्यातील दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती. आता 6 वर्षानंतर यातील आणखी एक म्हणजे तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीनेच पतीच्या खुन्याना मदत केल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे.
ही घटना आहे 27 जुलै 2012 मधली. या दिवशी अण्णा राव बनसोडे यांचा खून झाला होता. मात्र, यासाठी काही वर्षांपूर्वीच खुनाचा कट रचण्यात आला होता.
कसा होता खुनाचा कट ?
अण्णाराव बनसोडे फर्निचर चे काम करणारे अल्पउत्तपन कारागीर होते. लातूर जिल्ह्यातील सुमठाणा या गावाचे ते रहिवासी होते. दिवसभर काम करून त्यांच्या हाती अवघे पन्नास रुपये पडत होते. याच काळात रमेश विवेकी या विमा एजंटनी त्यांना हेरलं. त्यांना मोठं आमिष दाखवत लातुरात फर्निचरचं दुकान उघडण्यात आलं, अनेक कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. अण्णाराव यांच एक कोटींचा विमाही उतरवण्यात आला.
काही महिने यासाठीचे हफ्तेही भरण्यात आले. यासाठी त्यांची पत्नी ज्योती ही वारसदा होती. या सगळ्या योजना विमा एजंट रमेश विवेकी यांच्या गुन्हेगारी वृत्तीने तयार झाल्या होत्या. इथवपर्यंत रमेश विवेकीची योजना सफल झाली होती. आता वेळ होती अण्णारावचा अपघात भासेल, असा खून करण्याची.
असा केला खून ….
29 /07/2012 रोजी नायगाव भुसनी रस्त्यावर त्यांचा खून करण्याचा डाव आखण्यात आला. रमेश विवेकी यांना त्याचा साथीदार गोविंद सुबोधी याला हे काम सोपवलं. अण्णाराव आणि सुबोधी हे दोघे ठरलेल्या ठिकाणी आल्यावर योग्यवेळ साधून सुबोधीने अण्णाराव च्या डोक्यात लोखंडी रॉड ने वार केला त्यात अण्णाराव जागीच मृत झाला. दुचाकी लाईट फोडून अपघाताचा बनाव रचला. अपघात झाल्याची माहिती घरी कळवली. लातूरच्या सरकारी दवाखान्यात त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. या प्रकरणी औसा पोलिसांत अपघाती निधन झाल्याची नोंद करण्यात आली. या कामी औसा पोलीस ठाण्यातीळ काही कर्मचारी आणि खोटे साक्षीदार तयार करण्यात आले होते.
पोलीस ठाण्यात त्याच्या योजनेनुसार घटनाक्रम दाखल झाला होता. यामुळे रमेश विवेकी एक कोटी मिळवण्यासाठी कामाला लागला.
असा फसला डाव….
विमा कंपनीने कागदपत्रं तपासणी सुरू केली. औसा पोलीस ठाणे, घटनास्थळ पहाणी झाली; साक्षीदारांना घटनेची माहिती विचारली त्यावेळी शंका आल्या कारणाने त्यांनी औसा पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. औसा पोलिसांनी घटनाक्रम तपासला. औसा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्या कारणाने खुनाचा अपघात दाखविण्यात रमेश विवेकी यशस्वी झाला होता हे उघड झालं. पुढं पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि रमेश विवेकीचा कट उधळला गेला.
मे 2014 मध्ये घटनेतील सत्य समोर आलं. रमेश विवेकी आणि गोविंद सुबोधीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
कोण होता रमेश विवेकी ….
मास्टर माईंट विमा एजंट रमेश विवेकी हा साहित्यिक आहे. त्याचे एक कथा संग्रह आणि दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याने एक मराठी चित्रपटाची निर्मितीही केली आहे. प्रकाश नगर लातूर, येथे त्याचं तीन मजली घर आहे. मुळात त्याचा कोणता व्यवसाय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. पण, श्रीमंती बडेजावात तो राहत होता. उत्तम भाषाशैली आणि राहणीमान यामुळे त्याच्यावर कोणाचा संशय गेला नाही. त्यानंच गोड बोलून अण्णारावची पत्नी ज्योति हिला या कटात सहभागी करून घेतलं असा आरोप अण्णाराव च्या भावाने केला होता.
आठ वर्षांनी पत्नीचं नावही कटात समोर आलं…
सदर प्रकरणातील सर्व तपास संपला. न्यायालयातही हे प्रकरण दाखल आहे. न्यायालयानं अण्णाराव यांच्या भावाच्या तक्रारीत ज्योतीवरील संशय व्यक्त केला होता त्या तपासातील कागदपत्रं मागवली. मात्र पोलिसांनी यात तपास केला नव्हता कारण, ज्योतीनं आपल्या पतीचा घात करून हत्या केल्याची तक्रार दिली होती.
न्यायालायानं या प्रकरणाचा नव्यानं तपास करण्याच्या सूचना दिल्या. ज्योतीने विमा हफ्त्यातील 20 लाख पैकी 18 लाख रुपये घेतले होते. तपासात ही रक्कम उचलताना विवेकी सोबत असल्याची माहिती मिळाली. रमेश विवेकी यानं तिला वारसदार केलं होतं. तिला पैसे मिळाल्यावर त्यात तोही हिस्सेदार राहिला असता. यावरून पुन्हा तपासाची चक्रं फिरली. पुढं ज्योतीला पोलिसांनी अटक केली. तब्बल आठ वर्षानंतर पतीच्या खुनात सहभागी असलेली ज्योती गजाआड गेली आणि नात्यांमध्ये वरचढ ठरलेल्या पैशानं चुकीच्या मार्गाला गेलेली मानवी वृत्ती समोर आली. सध्या या प्रकरणात लातूर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *