भाळवणीत प्रेमविवाहाच्या रागातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण!

क्राईम सोलापूर

सोलापूर : मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलाच्या वडिलांना गावातील भर चौकात झाडाला बांधून मारहाण केल्याचा अमानुष आणि धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडला आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.

भाळवणी येथील एक तरुणीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे. या घटनेचा राग त्या मुलीचे संबंधित नातेवाईक आणि त्यांच्या भावकीला होता. त्याच रागातून मुलाच्या वडिलांना त्याच्या घरापासून दोरीने बांधून सुमारे तीन किलोमीटरवरुन गावापर्यंत मारहाण करत आणलं. त्यानंतर गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून आणखी मारहाण करण्यात आली.

दरम्यान या घटनेनंतर काही क्षणात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पोलिसांनी या मारहाण प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून इतर सहभागी आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या समाजातील आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी पळून जाऊन लग्न केले आणि पोलिसांसमोर हजर झाले होते. यावेळी दोन्ही पालकांनी पोलिसांसमोर पुन्हा लग्न लावून देण्याचे कबूल केल्यावर मुलगी घरी गेली होती. मात्र आपले लग्न लावले जाणार नाही याचा अंदाज आल्यावर हे दोघे पुन्हा पळून गेले. दरम्यान दोघेही सज्ञान असल्याचं कळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *