ठाणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सोईसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात हे कोविड सेंटर आहे. पीडित महिलेला आपल्या 10 महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत क्वारंटाइन करण्यात आले होते. याच सेंटरमध्ये तिच्या नात्यातील एक व्यक्तीला भेटायला गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
आरोपी हा पीडित महिलेला गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत येत होता. काही दिवसांनी या नराधमाने लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केले. या आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यात या आरोपीने तीन वेळी पीडितेवर अत्याचार केला होता, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी दिली.
आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पीडित महिलेनं तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती. पण, अखेर संतापाचा उद्रेक झाल्यामुळे या महिलेनं शनिवारी नवघर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.