क्रीडा स्पर्धेतील बनावट कागदपत्राद्वारे शासकीय नोकऱ्या लाटण्याचा प्रकार; PSI सह तिघांवर गुन्हा दाखल

क्राईम ताज्या घडामोडी महाराष्ट्र

नागपूर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून त्याद्वारे शासकीय नोकऱ्या लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नागपुरात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. संजय सावंत, पवन पाटील आणि निखिल माळी असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस खेळाडूंची नावे आहेत. राज्यात शेकडो बोगस खेळाडूंनी नोकऱ्या लाटल्याची माहिती समोर आली आहे. क्रीडा संचालनालय एकट्या नागपूर विभागात 21 प्रकरणाचा तपास करत आहे. 3 ते 5 लाखात बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक म्हणजे पवन पाटील आणि निखिल माळी यांनी ट्रेम्पोलिन या जिम्नॅस्टिक प्रकाराच्या खेळाचे प्रमाणपत्र मिळवत त्याआधारे नोकरी मिळविली होती. त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये मुंबईत राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्याचे नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात अशी कुठलीही राष्ट्रीय स्पर्धा मुंबईत झालीच नसल्याचे तपासात समोर आले आहे. तर संजय सावंत यानं पॉवर लिफ्टिंगचे बनावट प्रमाणपत्र बनवले होते आणि पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळविले होते. मात्र, ते प्रमाणपत्र ही खोटे निघाले आहे.

एकट्या नागपूर विभागात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 21 बनावट प्रमाणपत्रधारक 

सध्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न होता बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी बोगस खेळाडू लाटत असल्याच्या अनेक तक्रारी क्रीडा विभागात आल्या होत्या. त्यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयानं गंभीर दखल घेत तपास सुरू केले होते. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या नागपूर विभागात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 21 बनावट प्रमाणपत्रधारक शासकीय नोकऱ्या मिळवण्यात यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण आहे. त्यामुळं असे बनवाट प्रमाणपत्र तयार करून त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करत होतकरू तरुणांच्या नोकऱ्या बनावट खेळाडूंच्या पदरात टाकण्यात मदत करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *