Covid ची लस आल्यानंतरही नाही बदलणार जग; तज्ज्ञांनी दिला नवा इशारा

ताज्या घडामोडी देशविदेश

वॉशिंग्टन : सध्या सगळ्या जगात प्राधान्यक्रमाने फक्त Covid Vaccine या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून बड्या नेत्यांपर्यंत सगळेजण कोरोनावरची लस कधी येणार याचीच वाट पाहात आहेत. लस शेवटच्या टप्प्यात असल्याच्या चांगल्या बातम्याही येत आहेत. पण लस आल्यानंतर एका झटक्यात जग पूर्ववत होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे, असं तज्ज्ञ आता सांगत आहेत.

कोरोनाची लस येईल आणि सगळा धोका संपेल अशा आशेपायी उलट सध्या घेतोय या प्राथमिक काळजीकडेही दुर्लक्ष झालं तर कोरोनाचा धोका वाढण्याचीच शक्यता आहे.

लस आल्यानंतर लगेच कोरोनाची साथ संपणार नाही, असा इशारा जगभरातले आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग संपेल किंवा मास्क हद्दपार होईल अशी आशा ठेवण्यात अर्थ नाही. उलट तसं केल्यास धोका वाढेल, अशा इशारा जगभरातले तज्ज्ञ देत आहेत. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ इथले साहायक प्राध्यापक योनातन ग्रॅड म्हणतात, “लस हे काही रीसेट बटण नाही, की त्यामुळे एका झटक्यात आपण कोरोनापूर्व काळात जाऊ.” कोलंबिया युनिव्हर्सिटीतल्या तज्ज्ञ अँलजेला रॅसम्युसेन यांनाही ही शक्यता कमी वाटते.

कोरोनाचा धोका काही दिवसांमध्ये कमी होणार नाही तर पुढील काही महिने ही महासाथ असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसुद्धा (WHO) दिला आहे.

WHO चे संचालक डॉ. टेड्रॉस गेब्रेयसस (Dr Tedros Ghebreyesus) म्हणाले, “जगभरात अनेक ठिकाणी कोविडची लसनिर्मिती तिसऱ्या टप्प्यात आहे. क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. त्यामुळे लोकांना या संसर्गापासून वाचवण्याची आशा निर्माण झाली आहे. पण सध्या तरी हे एखाद्या जादूच्या कांडीसारखं काम करणार नाही. कदाचित कधीच नाही.”

जगभरात अनेक तज्ज्ञांनी हाच इशारा दिला आहे. लस प्रत्यक्षात आल्यानंतर ती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा कालावधी लागेल. कदाचित वर्षानुवर्षं यात जातील. शिवाय प्रत्यक्षात येणारी लस किती परिणामकारक आहे याचा निकाल लगेच लागू शकणार नाही. कुठलीही लस तिचा परिणाम दाखवण्यासाठी काही महिन्यांचा अवधी घेते. तोपर्यंत व्हायरसचा धोका असेलच.

कदाचित काही लशींचा दुसरा डोस घेणं आवश्यक ठरणार आहे. अशा वेळी जगभरातल्या एवढ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणं, तेवढ्या प्रमाणात लशीची निर्मिती होणं ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे लस निर्माण झाली की सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता नाही. मास्क फेकून दिले तरी चालतील, असं काही होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *