मंगळवेढयात वाळूचे वाहन सोडण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी पोलिस नाईकविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी सोलापूर


️मंगळवेढा(प्रतिनिधी )
 वाळूच्या पकडलेल्या ट्रॉलीवर कारवाई न करता सोडण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी बोराळे बीटचे पोलिस नाईक संतोष बाबू चव्हाण याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान,आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक अक्कलकोटकडे रवाना झाले आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील आरोपी पोलिस नाईक संतोष चव्हाण यानी तक्रारदारास दि. 13 मे रोजी 12.20 ते 12.51 च्या दरम्यान मंगळवेढा पोलिस स्टेशनचे इमारतीचे पाठीमागील बाजूस थांबून 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. सदर घटनेतील तक्रारदाराचा जबाब व ध्वनीमुद्रीत संभाषण याची पडताळणी करून मंगळवेढा पोलिस ठाण्यात आरोपी संतोष चव्हाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे येथील पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलिस अधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील  पोलिस उपअधिक्षक  अशोक शेळके,पोलिस नाईक विनोद राजे,पोलिस कॉन्स्टेबल काटकर व सुनिल भोसले आदीनी केली. या गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलिस निरिक्षक कविता मुसळे या करीत आहेत.दरम्यान,सदर घटनेतील आरोपी सध्या रजेवर असल्याने त्याच्या शोधासाठी लाचलूचपत विभागातील एक टिम अक्कलकोटकडे रवाना झाली असून आरोपीला अटक करून लवकरच न्यायालयात उभे करण्यात येणार असून तपासातून अनेक गोष्टी उघड होणार असल्याचे सांगण्यात आले.मागील एक वर्षापुर्वी एका पोलिस कर्मचार्‍याने वाळूच्या ट्रककडून मंथली हप्ता मागणी केली होती. चालकाने हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर सदर ट्रक पोलिस स्टेशन आवारात आणून लावल्यानंतर पोलिस स्टेशन आवारात लाच स्विकारताना तो पोलिस कर्मचारी लाचलूचपत पथकाच्या जाळयात अलगद अडकला होता. ठराविक भ्रष्ट कर्मचार्‍यांमुळे मंगळवेढयातील खाकी वर्दी बदनाम होत असल्याचे आजच्या घटनेवरून नागरिकांतून चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *