सहा महिन्यांनंतर देशातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : एकेकाळी 70 हजार, 80 हजार अशा मोठ्या आकड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच मागील काही दिवसांत कोरोना रुग्णवाढीचा हा वेग आता मंदावताना दिसत आहे. त्यामुळं कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या कमी होणं ही एक मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार देशात तब्बल सहा महिन्यांनंतर 19 हजारहून कमी रुग्ण आढळले आहेत. तर, सलग सातव्या दिवशी नव्यानं लागण होणाऱ्या कोरोना रुग्णांचा हा आकडा 25 हजारहून कमी असल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या 24 तासांत देशात 18732 जणांना कोरोनाची नव्यानं लागण झाल्याचं कळत आहे. तर, 297 जणांना या विषाणूच्या संसर्गामुळं आपले प्राण गमवावे लागले. आतापर्यंत देशात कोरोनाची लागण होऊन, त्यातून सावरत रुग्णालयातून रजा घेणाऱ्यांची संख्या 97,61,538वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करण्यांचा आकडा काहीसा जास्त म्हणजेच 21430 इतका असल्याची बाब निदर्शनास आली. ही संपूर्ण आकडेवारी पाहता आतापर्यंत भारतात तब्बल 1,01,87,850 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

जवळपास 17 कोटी कोरोना चाचण्या…

आयसीएमआरच्या माहितीनुसार 26 डिसेंबरपर्यंत कोरोनासाठी तब्बल 16 कोटी 80 लाख चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी शनिवारी 9 लाख चाचण्यांचे नमुने घेण्यात आले. सध्या देशातील 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचे 20 हजारहून कमी सक्रीय रुग्ण आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या 40 टक्के रुग्णसंख्या ही महाराष्ट्र आणि केरळातील आहे.

मृत्यूदर आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ अशा राज्यांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीपैकी जवळपास 52 टक्के प्रमाण हे याच राज्यांतून असल्याचं कळत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरही कमी होऊन 1.45 वर पोहोचला आहे. तर, सक्रिय रुग्णांचं प्रमाण 3 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *