कोरोना आहे की नाही 2 तासांत कळणार, स्वदेशी ‘फेलुदा’ चाचणीला मान्यता

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर वाढत आहे. भारतात कोरोनाचे जवळपास 90 हजारहून अधिक रुग्ण दर दिवसाला सापडत आहेत. असं असतानाच कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यावर सरकारकडून भर दिला जात आहे. कोरोनाची चाचणी करणं आता आणखीन सोपं होणार आहे. याचं कारण म्हणजे गर्भारपणाच्या चाचणी सारखीच एका स्ट्रीपवर ही चाचणी करता येणं आता घरच्या घरी शक्य झालं आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी एक खास कीट तयार करण्यात भारतीय शस्त्रज्ञांना मोठं यश आलं आहे. गर्भारपणाच्या टेस्ट सारखीच पेपर स्ट्रिपवर ही चाचणी करण्यात येते आणि केवळ 2 तासांत त्याचा निकालही आपल्याला कळू शकतो अशी चाचणी करणारं हे कीट शास्रज्ञांनी शोधून काढलं आहे.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) व इन्स्टिट्युट ऑफ जिनोमॅटिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजीच्या (IGIB) संशोधकांनी ही टेस्ट शोधली आहे. या टेस्टचं नाव टाटा सीआरआयएसपीआर (TATA CRISPR) क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॉलिड्रोमिक रिपिट्स) कोविड-19 टेस्ट म्हणजेच ‘फेलुदा’ ठेवण्यात आलं आहे. ही टेस्ट व्यावसायिकदृष्ट्या सुरू करण्यास शनिवारी (19 सप्टेंबर) ड्रग्ज कंट्रोलकर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) मान्यता मिळाली आहे, अशी माहिती सीएसआयआरच्या (CSIR) वतीने देण्यात आली.

ही स्वदेशी चाचणी खूपच उपयुक्त ठरणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे पेपर स्ट्रिपवर ही करता येणार आहे आणि दोन तासांतच पेपर स्ट्रिपच्या बदलत्या रंगावरून त्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे कळणार आहे. ‘कोरोना विषाणूच्या जीन्सचा क्रम लक्षात यावा यासाठी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या सीआरआयएसपीआर या तंत्रज्ञानाचा उपयोग या चाचणीमध्ये करण्यात आला आहे,’ अशी माहिती सीएसआयआरने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

पारंपरिक आरटी-पीसीआर टेस्ट इतका अचूक निकाल टाटा सीआरआयएसपीआर या नव्या टेस्टमधून मिळतो. त्याचबरोबर कमी वेळात, कमी खर्चात ही टेस्ट होणार असून, ती सोप्या पद्धतीने करता येईल असा दावा कंपनीने केला. जर या पेपर स्ट्रिपवर कोरोना विषाणू आला तर ती स्ट्रिप लगेच रंग बदलते. या टेस्टने दिलेल्या निकालांपैकी 96 टक्के निकाल अचूक आल्याचं मतही शास्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.‘फेलुदा’ या स्वदेशी टेस्टमुळे रुग्णांची तपासणी मोठ्या प्रमाणात करणं तसंच त्याचा लवकर निकाल सांगणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची दिशा ठरवणंही सोपं होईल. भारतीय शास्रज्ञांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या देशातील लढाईमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे टेस्ट करण्याची क्षमता वाढेल आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलणं आणखीन सोपं होऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *