एकाच कुटुंबातील तीन भावांचा करोनानं मृत्यू

महाराष्ट्र


पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात एकाच कुटुंबातील 18 जणांना करोनाची लागण झाली होती. यांपैकी, तीनही सख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली. मृत्यू झालेल्या तिन्ही भावांचे वय 60 वर्षांच्या पुढे होते.पोपटराव कलापुरे (वय 66), ज्ञानेश्वर कलापुरे (वय 63) आणि दिलीपराव कलापुरे (वय 61, सर्वजण रा. पिंपरी) असे करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यावर 15 दिवसांपासून चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कलापुरे कुटुंबामध्ये एकूण 18 सदस्य असून ते एकत्रित राहतात. त्यात मोठ्या तेरा व्यक्ती असून पाच लहान मुले आहेत. पैकी, एकाला पाच जुलै रोजी करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार इतर कुटुंबातील सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच 18 जण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्वजण तातडीने चिंचवड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. त्यानंतर काही दिवसांनी यांपैकी 15 जणांना सौम्य लक्षण असल्याने डिस्चार्ज देण्यात आला.परंतु, कुटुंबातील आधारस्तंभ असलेल्या तिन्ही भावंडांची प्रकृती खालावत चालली होती. सगळ्यात लहान भाऊ असलेले दिलीप कलापुरे यांना पहिल्यांदा अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यापाठोपाठ दोन्ही भावांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनाही अधिकच्या उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यांपैकी, दिलीप यांचा उपचारादरम्यान 10 जुलै रोजी मृत्यू झाला. या धास्तीने पाच दिवसांनी पोपट कलापुरे तर त्यानंतर दोन दिवसांनी ज्ञानेश्वर कलापुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कलापुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या नऊ दिवसांमध्ये कलापुरे कुटुंबाने तीन आधारस्तंभ गमावले.दरम्यान, नागरिकांनी करोनाला विषाणूपासून कुटुंबाला सुरक्षित केले पाहिजे तसेच स्वतः ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *