भारताला मोठं यश; पहिली स्वदेशी लस COVAXIN चं शेवटचं ट्रायलही यशस्वी

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोना लशीबाबत भारताला मोठं यश मिळालं आहे. पहिल्या स्वदेशी लशीचं शेवटचं ट्रायलही यशस्वी झालं आहे. भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे.

कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे आणि भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे.

भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 ही लस.  या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं याआधी जारी केला होता. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला होता. ही लस यूकेत (UK) आढळलेल्या  नव्या कोरोनाव्हायरसविरोधातही प्रभावी आहे, अशी माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच लशीला मंजुरी दिल्यानं अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. लशीची सुरक्षितता आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र आता तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. त्यामुळे कदाचित या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

13-14 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड ही लस प्राधान्यानं दिली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तर कोवॅक्सिन ही लस बॅकअप म्हणून असेल. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात प्रभावी आहे. त्यामुळे या नव्या कोरोना उद्रेक झाला किंवा गरज पडली तर कोवॅक्सिन लस दिली जाणार असं सरकारनं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *