नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहणा-यासही कोरोनाची लागण

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी येथील नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहून परत आलेल्या तेलंगवाडी (ता. मोहोळ) येथील बापलेकाला गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मोडनिंब (ता. माढा) येथील नातेवाइकांकडे आले. त्या वेळी मोडनिंबकरांनी वेळीच सतर्कता दाखवून लांबूनच चर्चा करून त्यांना परत पाठवून दिले. यानंतर बोरामणी येथील विलगीकरण कक्षात दाखल करून बापलेकाच्या स्वॅबची तपासणी केली असता दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मोडनिंब येथील त्यांच्या 19 नातेवाइकांना माढा येथील विलगीकरण कक्षात हलविले आहे. Ad

याविषयी माहिती अशी, मोहोळ तालुक्‍यातील तेलंगवाडी येथील बापलेक दक्षिण सोलापूर येथील एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधीनंतर ते दोघे तेलंगवाडी येथे परत आले. परंतु हे दोघे रेड झोनमधून आल्यामुळे तेलंगवाडी येथील नागरिकांनी “तुम्ही इथे थांबू नका’ म्हणून तेलंगवाडीमध्ये राहण्यास विरोध केला. त्यानंतर ते दोघेही मोडनिंब येथे असलेल्या नातेवाइकांकडे आले. या वेळी नातेवाइकांनी त्यांना राहण्यास विरोध करून लांबूनच त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी आजूबाजूला राहणाऱ्या सतर्क नागरिकांनी सरपंच दत्तात्रय सुर्वे यांना फोन केला. मोडनिंबचे सरपंच दत्तात्रय सुर्वे यांच्यासमवेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश गिड्डे, रोटरी क्‍लब मोडनिंबचे सचिव मारुती वाघ, रिपब्लिकन पक्षाचे कुमार वाघमारे, राजेश निंबाळकर व सहयोग मित्रपरिवार यांनी तातडीने येऊन बापलेकाला “तुम्ही रेड झोनमधून आलेला आहात. आमच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असल्याने तुम्ही येथे थांबू नका’ असे सांगून त्यांना मोडनिंबमधून परत पाठवले. यानंतर ते पुन्हा सोलापूरला गेले असता त्यांना बोरामणी येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. 

त्या वेळी बापलेकाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले. शनिवारी (ता. 11) त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी भोसले, पोलिस नाईक आरिफ शेख, कॉन्स्टेबल विजय गोरे, मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पॉझिटिव्ह रुग्णांच्या 19 नातेवाइकांना माढा येथील विलगीकरण कक्षात हलविले आहे. 

याबाबत मोडनिंबचे सरपंच दत्तात्रय सुर्वे म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह बापलेकाला मोडनिंब येथे राहण्यास मनाई करून परत पाठविले आहे. मोडनिंब गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व पोलिस, आरोग्य, महसूल प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *