वडोदरा: COVID 19 च्या काळात वाढलेल्या रुग्णांची सेवा करुन एक नर्स घरी परतली. त्यानंतर तिचे नवऱ्यासोबत भांडण झाले. या घरगुती भांडणातून संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह PPE किटमध्ये घालून शहराच्या दुसऱ्या भागात फेकल्याचा धक्कादायक प्रकार गुजरात (Gujrat) मध्ये उघड झाला आहे.
गुजरातमधील वडदोरा (Vadodara) शहरातील हा धक्कादायक प्रकार आहे. शिल्पा जयेश पटेल असे या मृत महिलेचे नाव आहे. शिल्पा मेंटल हॉस्पिटलमील नर्स होती. मात्र वडोदरामधील गोत्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची COVID रुग्णांची सेवा करण्यासाठी बदली करण्यात आली होती. शिल्पा शुक्रवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून घरी परतली. त्यानंतर शहरातील न्यू व्हीआयपी रोडवर तिचा मृतदेह सापडला होता.
शिल्पाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पथक तिच्या घरात चौकशीसाठी पोहचले. त्यावेळी शिल्पाचा पती जयेशने सुरुवातीला रडण्याचे नाटक केले. त्यावेळी त्याच्या हातावर आणि पोटावर रक्ताचे डाग पाहिल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर जयेशने त्याचा गुन्हा मान्य केला. जयेशने शिल्पाच्या डोक्यावर जड पदार्थाने हल्ला करुन तिला ठार मारले. त्यानंतर शिल्पाचा मृतदेह कारमधून शहराच्या दुसऱ्या भागात फेकून दिला, असे पोलिसांनी सांगितले.
शिल्पाच्या हत्येपूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी संतापलेल्या जयेशने शिल्पाला ठार मारण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्या दोघांमध्ये गेल्या एक वर्षांपासून भांडण सुरु होते. या भांडणाला कंटाळून शिल्पाने आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती, अशी माहिती आता पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे.