कोरोनावरील डोस दिल्यानंतर ‘त्या’ तरूणात बदल आढळले का? देशातील सहा शहरात सुरु झाल्या मानवी चाचण्या

ताज्या घडामोडी देशविदेश


नवी दिल्ली : जगातील अन्य देशांप्रमाणे भारतातही करोना व्हायरसला रोखणारी लस विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लसी क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. देशातील सहा शहरात भारत बायोटेकने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत.
शुक्रवारी एका 30 वर्षीय तरुणाला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन लसीचा 0.5 एमएलचा डोस देण्यात आला. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांना फेज 1 आणि फेज 2 मानवी चाचण्यांची परवागनी देण्यात आली आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या मदतीने कोव्हॅक्सीनची निर्मिती केली आहे.

एम्स, पाटणा, रोहतकसह एकूण 12 रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सीनची चाचणी होणार आहे. पहिल्या फेजमध्ये 18 ते 55 वयोगटातील 500 स्वयंसेवकांवर चाचणी होईल. झायडसने विकसित केलेल्या झायकोव्ह-डी च्या सध्या अहमदाबादमध्ये चाचण्या सुरु आहेत. लवकरच देशातील अन्य शहरातही झायकोव्ह-डी च्या चाचण्या सुरु होतील. प्राण्यांवरील चाचणीत झायकोव्ह-डी ची लस यशस्वी ठरली आहे.
हैदराबाद, पाटणा, कांचीपूरम, रोहतक आणि नवी दिल्ली या शहरात कोव्हॅक्सीनच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. नागपूर, भुवनेश्वर, बेळगाव, गोरखपूर, कानपूर, गोवा आणि विशाखापट्टणम या शहरातही कोव्हॅक्सीनच्या चाचण्या लवकरच सुरु होतील. दिल्लीत एम्समध्ये युवकाला कोव्हॅक्सीन लसीचा डोस दिल्यानंतर दोन तास या युवकाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याच्यामध्ये कुठलेही गंभीर साईड इफेक्ट आढळले नाहीत. म्हणून त्याला घरी सोडण्यात आले. आता पुन्हा दोन दिवसांनी आम्ही त्याची तपासणी करु असे लस प्रकल्पाचे प्रिन्सिपल इन्वेसटिगेटर डॉ. संजय राय यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *