बार्शीत कोरोना देवीची स्थापना, कोंबडं, बोकडाचा नैवेद्य

ताज्या घडामोडी सोलापूर

बार्शी: बार्शी शहरातील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. एवढंच नाही तर स्थापन केलेल्या कोरोना देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी कोंबडं, बोकडाचा बळी देवून तिचं पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पारधी वस्तीत एका घराबाहेर फरशीचा छोटासा ओटा तयार करण्यात आला आहे. त्यावर एक दगड ठेवून तर आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देऊळ बांधण्यात आलं आहे. तर एका महिलेनं देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना केल्याची माहिती उजेडात आली आहे.

कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितल. देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. कोरोना महामारीनं सर्वत्र थैमान घातल्याने वैद्यकिय यंत्रणा, शासन आणि प्रशासन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु बार्शीतील पारधी समाजानं 21 व्या शतकात देखील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करून त्याचे पूजन केल्याने त्यांच्याकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे उघड झालं आहे.

दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. माणसाचं मन भावनिकतेने विचार करतं. त्यातूनच हे लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारिरीक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *