ऑगस्टमध्येच उपलब्ध होणार कोरोना लस; रशियाचा दावा

ताज्या घडामोडी देशविदेश

मॉस्को : कोरोनाव्हायरसविरोधातील लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशात रशियाने कोरोना लशीबाबत मोठी घोषणा केली आहे. रशिया आपली कोरोना लस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे ऑगस्टमध्येच ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल असा दावा रशियाने केला आहे.

दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत रशिया आपल्या कोरोना लशीला परवानगी देणार आहे, असं वृत्त सीएनएनने दिलं आहे.  रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट किंवा त्याआधी लशीला परवानगी देण्याच्या दिशेनं तयारी सुरू आहे. मॉस्कोतील गमलेया इन्स्टिट्युटने विकसित केलेली लस आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणारी ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

रशियाने ही लस विकसित केली असली तरी त्याच्या चाचणीचा कोणताही वैद्यकीय अहवाल रशियाने प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित आणि परिणामकारक असेल हे सांगू शकत नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जगभरात सध्या शेकडो कोरोना लशी तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही लशींची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. तर काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. या लशींचेही सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसत असले तरी लशीची पूर्णपणे सुरक्षितता समजल्याशिवाय शास्त्रज्ञ लस बाजारात आणण्याची घाई करत नाही आहे. मात्र रशियामध्ये वेगळं चित्र दिसतं आहे. कोरोना लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी रशियात राजकीय दबाव असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *