बाबा, माझ्या उपचारासाठी खर्च केला तर पम्मीचं लग्न कसं होईल? ते शब्द ठरले अखेरचे; कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू

ताज्या घडामोडी देशविदेश

खनऊ : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे. रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत असल्यानं मोठा खर्चही करावा लागत आहे. अशात आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या रुग्णांचे जास्तच हाल होत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका मुलानं चार मे रोजी संध्याकाळी आपल्या वडिलांसोबत फोनवरुन बातचीत केली. तो म्हणाला, माझ्या उपचारासाठी आईचे दागिने विकले. तुमच्या खात्यामध्ये जे पैसे होते तेही संपले. आता मला असं समजलं की तुम्ही उन्नाव बायपासवरील घर तारण ठेवण्याचा विचार करत आहात. माझ्यावर उपचार करण्यात सगळं संपून जाईल. मग पम्मीचं (बहीण) लग्न कसं होणार. मी वाचेल की नाही हे नक्की नाही. त्यामुळे, मला देवाच्या विश्वासावर सोडून द्या. यानंतर शुक्रवारी या मुलाचं कोरोनानं निधन झालं आहे.

उन्नावचे रहिवासी असलेल्या रामशंकर यांच्या घरावर 17 एप्रिलला हे संकट येऊन कोसळलं. त्यांची पत्नी जलज आणि 23 वर्षीय मुलगा सुशील याला कोरोनाची लागण झाली. यातून पत्नी तर बरी होऊ लागली मात्र मुलाची प्रकृती गंभीर होत गेली. यानंतर त्यांनी उपचारासाठी त्याला उन्नावमधून कानपूरमध्ये नेलं. मात्र, खूप प्रयत्न करुनही रुग्णालयात जागा मिळाली नाही. यानंतर त्यांनी मुलाला लखनऊमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी आधी 80 हजार जमा करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर दररोज 25 हजार खर्च सांगितला. रामशंकरकडे जेवढे पैसे होते, ते सगळे उन्नाव आणि कानपुरमध्येच उपचारादरम्यान खर्च झाले. पैशांची आणखी गरज पडल्यानं पत्नीनं मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने विकले आणि 3.30 लाख रुपये रामशंकर यांना दिले.

उन्नावमध्ये घरातच छोटंस किराणा दुकानं चालवणाऱ्या रामशंकर यांनी सांगितलं, की दागिने विकून जे पैसे आले ते त्यांनी रुग्णालयात भरले. त्यांना माहिती होतं, की उपचारासाठी आणखी पैसे लागतील. मात्र, पैसे जमा होत नसल्याचं दिसल्यानं त्यांनी आपलं घर तारण ठेवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट सुशीलला माहिती होताच त्यानं रुग्णलायातील एका वॉर्ड बॉयच्या फोनवर वडिलांसोबत बोलत असं न करण्याचा सल्ला दिला.

शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी सांगितलं, की सुशीलचा मृत्यू झाला आहे. ही ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ते चक्कर येऊन पडले. आसपास असणाऱ्या लोकांनी त्यांना सांभाळलं. ही बातमी पत्नी आणि मुलीला सांगण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं. रुग्णलायानं रुग्णावाहिकेतून मुलाचा मृतदेह आलमबाग स्माशानभूमीपर्यंत पोहोचवला. याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *