लातूरमधील एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

लातूर : राज्यावर कोरोनाचे  संकट पुन्हा एकदा ओढावले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर लातूर शहरात एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लातूर महापालिकेने  ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी  कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण का वाढले?

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोरोनाची प्रकरणं ज्या भागामधून आली ते सर्व भाग एकमेकांशी संबंधित आहेत. अमरावती हा ग्रामीण भाग आहे. ज्याठिकाणी कॉन्टॅक्स ट्रेसिंगचे प्रमाण खूप कमी आहे. हेच प्रमुख कारण आहे की हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. याठिकाणी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अशीच परिस्थिती आहे.

दुसरे कारण म्हणजे लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. आधी वैज्ञानिकांपासून ते डॉक्टरांपर्यंत कोणालाच या व्हायरसबाबत फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्याविषयी सतत चर्चा केली जात होती. उपचाराबाबत माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. अशातच इटली आणि अमेरिकामध्ये लोकांच्या मृत्यूचे प्रमाण सतत वाढल्याचे वृत्त येत होते. त्यामुळे भारतातील जनता भितीमुळेच सतर्क होती.

जानेवारीत या राज्यात 14000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. प्रचाराच्या आणि मतदानाच्या वेळी दररोज लोकं घराबाहेर पडायचे आणि इतरांच्या संपर्कात येत होते. यामुळे अमरावती आणि सातारा सारख्या जिल्ह्यांमधील कोरोनाची प्रकरणे अचानक वाढली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा सुरु करण्यात आली. ऑफिस, शिक्षण किंवा इतर कामांसाठी अनेक जण घराबाहेर पडू लागले.

कोरोनावर लस आली आता भीती नाही, तर काहींनी कोरोना गेला असे समजून मास्कचा वापर करणं देखील टाळलं. मास्क घालणं अनिर्वाय असल्यामुळे लोक फक्त अशाच ठिकाणी त्याचा वापर करत होते ज्या ठिकाणी पोलिस कारवाईची भीती आहे. मास्क तोंडाला नाही तर हनुवटीवर लावून लोक फिरत आहेत. ही सगळी कारणं कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढण्यामागे आहेत.

दुसरीकडे शाळा, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक कार्यक्रम सुरू करणं देखील प्रमुख कारण आहे. ज्या राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात येत आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असला तरी सुद्धा ते वाहकाचे काम करतात. अशा परिस्थितीत घरातील इतर सदस्य आणि वयोवृद्धांना कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *