मुंबई : कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनात शिवसेनाही रस्त्यावर उतरण्याची चिन्ह आहे. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांची भेट घेतली आहे.
शिवसेनेनंही या आंदोलनात पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अकाली दलाच्या नेत्यांनी आंदोलनाबद्दल माहिती दिली. तसंच या आंदोलनात शिवसेनेनंही सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अकाली दलाच्या नेत्यांना आश्वासन देत पुढील दोन आठवड्यात दिल्लीला येणार असल्याचे सांगितले.
तसंच, ‘केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे आणि त्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असं मत यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केले.
शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट
दरम्यान, शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे. कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे.
तसंच, ‘पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. याचे गांभीर्य सरकारने घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. जर असंच राहिले तर हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्याच्या आंदोलनात पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करतील. त्यामुळे मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला.