विठ्ठल मंदिरात अधिकाऱ्यांना केली गाभाराबंदी, प्रक्षाळपूजेची मनमानी भोवण्याची शक्यता

पंढरपूर

पंढरपूर प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी वारीनंतर  प्रक्षाळ पूजेवेळी स्नान घालताना अधिकाऱ्यांनी स्वतःही स्नान करून घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही आषाढी वारीची महापूजा करताना मूर्तीला कोणताही स्पर्श होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेत अगदी कमी कालावधीत पूजा पार पाडली होती. मात्र त्यानंतर ९ जुलै रोजी पार पडलेल्या प्रक्षाळपूजेच्यावेळी अधिकाऱ्यांनी स्वतः श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अनेकदा स्पर्श करत देवाच्या सोबतच स्वतःच्या आंगावरही पाणी ओतून घेतल्याने तमाम महाराष्ट्रात वाद उफाळला होता.

संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना व स्वतः मंदिर समितीच्या काही सदस्यांनीही याप्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केली होती.त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे  बैठक घेत प्रक्षाळ पूजेवेळी झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच जोपर्यंत चौकशी पार पडत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी बंदी करण्यात आल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.ही बैठक मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस मंदिर समिती सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे,डॉ. दिनेशकुमार कदम,श्री भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा,श्री संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, हभप ज्ञानेश्वर देशमुख,ऍड.माधवी निगडे,हभप प्रकाश जवंजाळ,श्री भागावतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी ,हभप शिवाजीराव मोरे,सौ.साधना भोसले आदी उपस्थित होते.

कारवाईकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष 

तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठुरायाचे मंदिर गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.त्यासोबतच कार्तिकी व आषाढीचा वारी सोहळाही यंदा रद्द करण्यात आल्याने महाराष्ट्रातील तमाम वारकरी भक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले आहेत.मात्र मंदीरच बंद असल्याने त्यांना दर्शन मिळणे कठीण होऊन बसले आहे.अशातच प्रक्षाळ पूजेवेळी झालेल्या घटनेचा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून तमाम महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला जात आहे.त्यातच संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः मंदिर समितीच्या सहअध्यक्ष असलेल्या औसेकर महाराजांनाही प्रवेश नाकारला होता.मात्र संबंधित अधिकाऱ्याने पूजेवेळी स्वतः मनमानी केल्याची चर्चा सुरू झाल्याने कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *