मोटारसायकल अडवून डोळ्यांत चटणीची टाकून एक लाख लुटले

0
144
जनसत्य प्रतिनिधी
मोहोळ : सोन्या-चांदीचे दुकान बंद करून सायंकाळी घराकडे परत येणाऱ्या पती-पत्नीची मोटारसायकल अडवून त्यांच्या डोळ्यांत चटणीची भुकटी टाकून लोखंडी कोयत्या चा धाक दाखवीत एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटुन पसार झालेल्या टोळीला चोवीस तासाच्या आत पकडण्यात मोहोळ पोलिसांना यश आल्याची घटना दि.६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सौंदणे कट परिसरामध्ये घडली.
  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे प्रकाश सदाशिव हंबीरे यांचे अंकोली गावांमध्ये सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानांमध्ये ते पत्नीसह दररोज जातात. दि.६ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७ वाजनेचे दरम्यान दुकान बंद करून दुकानातील सोन्या-चांदीचे एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने आपल्या पर्समध्ये ठेवून ते दोघे मोटार सायकल वरून मोहोळ कडे येत असताना सौंदणे कट परिसरात पाठीमागून दोन मोटार सायकल वरून आलेल्या पाच जनानी मोटारसायकल आडवी लावून पत्नीच्या गळ्याला लोखंडी कोयता लावून दोघांच्या डोळ्यात व तोंडावर चटणी टाकून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने असणाऱ्या पर्स हिसकावून घेऊन मोहोळ च्या दिशेने पोबारा केला.
दरम्यान प्रकाश हंबीरे व त्यांच्या पत्नीने जवळील असलेल्या पाण्याने तोंड धुतले. त्याच दरम्यान ७ .४५  वाजनेचे सुमारास  मोहोळ कडून सौंदणे कडे दोन मोटारसायकली वेगात माघारी जाताना दिसल्या. हंबीरे यांना या मोटार सायकलस्वारांचा संशय आल्याने त्यांनी तातडीने सौंदणे परिसरातील लोकांना फोन करून आम्हाला लुटणारे दोन मोटरसायकल स्वार त्या दिशेने येत असल्याचे सांगितले. याचाच धागा पकडून सौंदणे परिसरातील एका दूध डेअरी वर असणाऱ्या नागरिकांनी सतर्कता दाखवत समोरून येणाऱ्या दोन मोटार सायकली पैकी एक मोटासायकल अडवून मोटरसायकल स्वारांना पकडले असता त्यांच्याजवळ लुटलेली पर्स निदर्शनास आल्याने त्यानी तातडीने मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पो. नि अशोक सायकर यांनी रात्री तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण यांच्यासह पोहे कॉ निलेश देशमुख, रवींद्र बाबर, मंगेश बोधले, हरीश थोरात, अमोल घोळवे, विकास हजारे, चालक चौधरी यांच्या पथकाने  घटनास्थळी धाव घेत मोटरसायकल वरील सोनू शंकर बनसोडे रा. नारायण चिंचोली, (ता. पंढरपूर), उमेश चंद्रकांत रणदिवे रा. गिरवी  (ता. इंदापूर) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. या दोघाना दि. ७ ऑगस्ट रोजी अटक करुन   मोहोळ येथील न्यायालयासमोर हजर केले असता १० ऑगस्ट पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान या दरोड्याचे तपासी अधिकारी राजकुमार डुनगे यांनी ७ ऑगस्ट रोजी सकाळी तपासाची सूत्रे हातात घेताच या दरोड्यातील अन्य चार जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये किरण सज्जन गायकवाड, योगेश अशोक गायकवाड दोघेही रा. अंकोली (ता. मोहोळ), अभिजीत विठ्ठल बंदपट्टे, मनोज बाळू वाघमारे दोघेही (रा. पंढरपूर) अशा चौघांचा समावेश असून या प्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळ पोलिस स्टेशनला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. फिर्यादी प्रकाश सदाशिव हंबीरे यांना भेटून घटनेची सविस्तर माहिती घेऊन अटक केलेल्या संशयित आरोपींकडून आणखी गुन्ह्याची उकल होते आहे का? याचा तपास करण्याचे आदेश त्यांनी तपास अधिकारी यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here