…शरद पवार माझा बापच आहे’, पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ  झाली आहे. त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यावर नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं.

नवऱ्याविरोधात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘एफआयआरची कॉपी माझ्या घरी पाठवायला तुमच्याकडची माणसं संपली का. माझ्या नवऱ्याने एक रुपया पण नाही घेतला.’ किशोर वाघ यांना एसीबीनं व्हॉट्सअॅपवरून नोटीस पाठवल्याचं त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की 1 जानेवारी 2021 ला या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि याची माहिती देखील त्यांना पत्रकारांकडून मिळाली.

‘2017 मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. माहिती घेतली आणि सांगितलं की यात तुझ्या नवऱ्याचा काहीच दोष नाही. मला आज पवार साहेबांची खूप आठवण येतेय. होय शरद पवार माझा बापच आहे’, ही आठवण सांगत त्यांनी पुन्हा एकदा किशोर वाघ निर्दोष असल्याचे सांगितले.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, ‘ 2011 पासून एसीबीच्या अनेक केस पेंडिंग आहेत. या केसमध्ये देखील पैसे घेणाऱ्या मुख्य आरोपींची चौकशी सुरू आहे पण गुन्हा मात्र माझ्या नवऱ्यावर? मी न्यायालयात लढेन. फक्त चित्रा वाघचा नवरा आहे याची शिक्षा किशोर वाघ यांना दिली जात आहे’.

यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा देखील पुनरुच्चार केला. याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘मी तुम्हाला पुरून उरेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केलेत तरीही मी रोज बोलणार. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.’ संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.

किशोर वाघ हे मुंबईतील परेल याठिकाणी असणाऱ्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. दिनांक 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच दिनांक 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.

या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) व 13(1)E या कलमांतर्गत दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *