जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा, चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन

ताज्या घडामोडी देशविदेश

बीजिंग: आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा असं आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना शी जिनपिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शी जिनपिंग म्हणाले की, “सैनिकांनी संकाटाची चिंता करु नये. आपल्याला युध्दाला सामोरं जावं लागणार आहे या दृष्टीकोनातून लष्कराने ट्रेनिंग आणि तयारी करावी. पीपल्स लिबरेशन आर्मीचा विस्तार करणं हेच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ध्येय आहे.”

वृत्त एजन्सी शिन्हुआने दिलेल्या एका बातमीनुसार सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या एका बैठकीत शी जिनपिंग यांनी आधुनिक काळासाठी लष्कराच्या बळकटीकरणासोबतच लष्कराच्या रणनीतीवर कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणी लागू करण्यावर जोर दिला आहे. चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपदही शी जिनपिंग यांच्याकडेच आहे. सेट्रल मिलिटरी कमिशनच्या अंतर्गत 20 लाख संख्येच्या चीनी लष्कराचा समावेश होतो.

चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. तैवानच्या मुद्द्यावरुनही जगभरातील देशांनी चीनच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच अमेरिकेसोबतही वेगवेगळ्या स्तरावर चीनचा तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी लष्कराला केलेल्या युध्दासाठी तयारी राहण्याच्या आवाहनामुळे जगभरातील देशांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसात चीनच्या राष्ट्रपतींनी सातत्याने त्यांच्या लष्कराला युध्दास तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी चीनच्या नौसेनेला सांगितलं होतं की त्यांनी आपल्या बुध्दीचा वापर युध्द जिंकण्यासाठी करावा.

चीन प्रोपगंडामध्ये माहिर आहे. या कौशल्याच्या जोरावर सातत्याने तो भारत, तैवान आणि अमेरिकेला वेगवेगळ्या पध्दतीनं आव्हान देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *