CBI कोठडीमधून 45 कोटींचं 103 किलो ग्रॅम सोनं गायब

ताज्या घडामोडी देशविदेश

चेन्नई : देशातील गुन्ह्यांचा तपास करणारी सर्वोच्च यंत्रणा म्हणून सीबाआय (CBI) ओळखली जाते. ‘सरकारच्या पिंजऱ्यातील पोपट’ या शब्दात सीबीआयवर यापूर्वी सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आधीच देशभर बदनाम असलेल्या सीबीआयच्या अडचणीत भर घालणारी आणखी एक घटना उघड झाली आहे.

तामिळनाडू (Tamil Nadu) मधील छापेपारीच्या दरम्यान सीबीआयनं 103 किलो ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. या सोन्याची एकूण किंमत 45 कोटी होती. सीबाआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं हे सोनं आता गायब झालं आहे. मद्रास हायकोर्टानं (Madras High Court) या प्रकरणात तामिळनाडू सीबी-सीआयडीला (CB-CID) चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

सीबीआयच्या टीमनं 2012 साली चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑफिसवर छापा टाकला होता.  या कारवाईत सोन्यांच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरुपात 400.5 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. हे सर्व सोनं सीबीआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होते. आता यामधील तब्बल 103 किलोग्रॅम सोनं गायब असल्याचं उघड झालं आहे.

सीबीआयचा दावा काय?

हे सोनं ज्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्या 72 किल्ली चेन्नईच्या प्रिन्सिपल स्पेशल कोर्टाला देण्यात आल्या होत्या असा दावा सीबीआयनं केला आहे. त्याचबरोबर, ‘छापेपारीच्या दरम्यान सीबीआयनं सर्व सोनं एकत्र आणलं होतं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सुराना कॉर्पोरेशन यांच्यातील वादावर तोडगा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या लिक्विडेटरला हे सोनं सोपवताना त्याची विभागणी करण्यात आली होती. याच कारणामुळे सोन्याच्या वजनात आता फरक पडला आहे’, असे स्पष्टीकरण सीबीआयनं दिले आहे.

सीबाआयचे हे सर्व युक्तीवाद मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश प्रकाश यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणात एसपी रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सीबी-सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. ‘या सर्व प्रकरणामुळे तपास यंत्रणांची प्रतिष्ठा कमी होत आहे, त्यामुळे सहा महिन्याच्या आत याचा तपास करण्यात यावा’, असे आदेश न्या. प्रकाश यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *