मंगळवेढा :सबजेलमधून आरोपीला पोलिसांनी थेट नेले बोकडाची पार्टीला

क्राईम सोलापूर

सबजेलमधून आरोपीला पोलिसांनी  थेट नेले जेवायला

 मंगळवेढा   : मंगळवेढा सबजेलमध्ये खूनाच्या गुन्हयात असलेल्या आरोपीला पोलिस कर्मचार्‍यांनी दि.17 रोजी त्याच्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी चक्क पंढरपूर तालुक्यातील आरोपीच्या घरी  बोकडाची पार्टी दिल्याची  दिवसभर चर्चा सुरु होती.दरम्यान,या घटनेची पोलिस चौकशी सुरु झाली असून पोलिसांनी सी.डी.आर.काढून तपासाला गती दिली आहे.
पंढरपूर तालुक्यातील एक आरोपी खूनाच्या गुन्हयात मंगळवेढा सबजेलमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून आहे. दि.17 रोजी आषाढातला शेवटचा शुक्रवार असल्याने त्या दिवशी आरोपीच्या मूळ गावी व त्याच्या घरी बोकडाची पार्टी ठेवली होती. पोलिस व आरोपी यांच्या संगनमताने दि. 17 रोजी 12.30 वा.जेलच्या रजिस्टरला दवाखान्यात नेत असल्याची नोंद घेतली आहे.आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता पोलिसाने आरोपीला खाजगी गाडीतून चक्क दामाजी कारखाना चौकमार्गे आरोपीच्या गावी नेले.तेथे जेवणावर ताव मारून पुन्हा आरोपीला ग्रामीण रुग्णालयात घेवून गेले.यावेळी ग्रामीण रुग्णालयात रजिस्टर क्रमांक 1554 ला आरोपीचे नाव टाकून 2.24 वा. दाखल झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.  तेथील डॉक्टरांना पोटात दूखत असल्याचे सांगून गोळी घेवून पुन्हा सबजेलमध्ये आणून सोडले. या संपूर्ण घटनेमुळे गेली दोन दिवस दबक्या आवाजात सर्वत्र चर्चा सुरु होती. या घटनेचे बिंग प्रसारमाध्यमाव्दारे बुधवारी बाहेर पडल्याने पोलिसांनी चौकशीस प्रारंभ केला आहे.सदर आरोपी हा कोरोना पॉझिटिव्ह असताना त्याच्या मूळ गावी नेल्याने संकटाची मालिका सुुरू झाली आहे.कर्तव्यावर असलेल्या या पोलिसाला वरिष्ठ अधिकार्‍यांचा धाक आहे की नाही? असा सवाल या घटनेवरून जनतेमधून विचारला जात आहे.कारागृहातून थेट आरोपीच्या घरी नेण्याचे धाडस या पोलिसाने कुणाच्या बळावर केले असा सवालही नागरिकांमधून विचारला जातो आहे.मागील दोन दिवसापुर्वी सबजेलमधून तीन आरोपी पळाल्याची घटना ताजी असतानाच आरोपीला जेवण्यास त्याच्या घरी नेल्यामुळे मंगळवेढा पोलिस पुन्हा चर्चेत आले आहेत.या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषी पोलिस कर्मचार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तमाम जनतेमधून पुढे येत आहे.

कारागृहातून आरोपीला जेवायला नेल्याच्या घटनेची चौकशी युध्द पातळीवर सुरु असून कोणालाही यात पाठीशी घातले जाणार नाही,जे पोलिस कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
-दत्तात्रय पाटील, डी.वाय.एस.पी.मंगळवेढा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *