बार्शी : करोनाबाधित भोंदू डॉक्टराकडून घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार

सोलापूर

धक्कादायक : करोनाबाधित असलेल्या भोंदू डॉक्टराकडून घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार

सोलापूर : जिल्ह्यात करोना विषाणूचे भयसंकट वरचेवर वाढत असताना स्वतःच करोनाबाधित असलेला एक भोंदू डॉक्टर घरोघरी जाऊन संशयित रूग्णांवर उपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी शहरात उजेडात आला आहे. या भोंदू डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीमंत हरिश्चंद्र खंडागळे (वय 51, रा. बार्शी) असे स्वतः करोनाबाधित असलेल्या भोंदू डॉक्टराचे नाव आहे. यासंदर्भात संतोष जगन्नाथ जोगदंड (रा. बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खंडागळे हा भोंदू डॉक्टर असून त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची पात्रता नाही. वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नाही. यात पुन्हा तो स्वतः करोनाबाधित आहे. परंतु तरीही तो घरोघरी जाऊन संशयित रूग्णांवर वैद्यकीय उपचार करीत होता. या माध्यमातून घरोघरी गेल्याने अनेक संशयित रूग्ण त्याच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यात करोना विषाणूचा फैलाव वाढण्याचा धोका आणखी वाढला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी खंडागळे यास ताब्यात घेऊन त्याला, सर्वप्रथम उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच, त्याच्या विरोधात फसवणूक करणे, वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग नियंत्रण अधिनियम आणि महाराष्ट्र कोविड 19 विनिमय अधिनियम आदी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी शहर व तालुक्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत 345 बाधित रूग्ण आढळून आले असून आठजणांचा बळी गेला आहे. खंडागळे हा स्वतः करोनाबाधित असताना वैद्यकीय उपचार करून न घेता करोनाचा प्रादुर्भाव फैलावण्याच्या हेतूने घरोघरी भेटी देऊन संशयित रूग्णांवर उपचार करीत होता. त्याने आतापर्यंत किती घरांना भेटी देऊन किती संशयित रूग्णांशी संपर्क केला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *