देशात लवकरच सुरू होणार 8 नव्या बँका

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: देशातील तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग व्यवस्थापोहोचावी यासाठी गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासह बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, खासगी कंपन्या यांनाही या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे. आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्गम, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कंपन्यांना बँकिंग यंत्रणा उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण रिझर्व्ह बँकेनं स्वीकारलं आहे. यामुळे अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बँकिंगक्षेत्रात अनेक खासगी कंपन्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये उज्जीवन, जनलक्ष्मी, इक्विटास, उत्कर्ष, सूर्योदय, कॅपिटल अशी कितीतरी नावं सांगता येतील.

अगदी सूक्षम,लघू उद्योगांना कर्ज पुरवठा व्हावा, अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना बँकिंग सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी छोट्या स्वरूपातील बँकांचे जाळे उभारण्यावर भर दिला जात आहे. युनिव्हर्सल बँक (Universal Bank) या प्रकाराअंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या मोठ्या आकाराच्या बँकांचा समावेश होतो. सध्या युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँक अशा दोन्ही प्रकारातील बँका सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या पुढाकार घेत आहेत.

रिझर्व्ह बँकेनं बँकिंग परवान्यासाठी कधीही अर्ज करण्याची ऑन टॅप नावाची सुविधा सुरू केली असून, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना 1 ऑगस्ट 2016 आणि 5 डिसेंबर 2019 रोजी जारी करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत नुकतेच बँकेकडे आठ अर्ज दाखल झाले असून, यामध्ये चार अर्ज युनिव्हर्सल बँक प्रकारासाठी तर चार अर्ज स्मॉल फायनान्स बँकेसाठी आहेत.

युनिव्हर्सल बँक

युएई एक्सचेंज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, द रिपेट्रीएटस कोऑपरेटिव फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक लि. (REPCO Bank), चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड, पंकज वैश्य आदी कंपन्यांनी युनिव्हर्सल बँकेच्या परवान्यासाठी ऑन टॅप परवाना सुविधेअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत.

स्मॉल फायनान्स बँक

स्मॉल फायनान्स बँकेसाठी व्हिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कॅलिकट सिटी सर्व्हिस कोऑपरेटिव बँक लि., अखिल कुमार गुप्ता आणि क्षेत्रीय ग्रामीण फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आदी कंपन्यांनी अर्ज केला आहे.

रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, युनिव्हर्सल बँकेचा परवाना मिळवण्यासाठी कंपनीचे किमान नेटवर्थ 500 कोटी रुपये असणे आवश्यक आहे, तर स्मॉल फायनान्स बँकेसाठी नेटवर्थ 200 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. एखादी शहरी सहकारी बँक स्वेच्छेनं स्मॉल फायनान्स बँकेत परिवर्तीत होऊ इच्छित असेल तर सुरुवातीला तिचे नेटवर्थ 100 कोटी रुपये असल्यास तिला परवानगी मिळू शकते; मात्र पुढील पाच वर्षांत ते 200 कोटी करणे अत्यावश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *