बजरंग पुनियाला कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानाला दाखवलं अस्मान!

0
42

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

सामन्यापूर्वी बजरंगच्या वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. ”माझा मुलगा आजपर्यंत कधीही रिकाम्या हाताने परतला नाही. संपूर्ण देशाच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. महिनाभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने उपांत्य फेरी गाठली. दुखापतीमुळे तो आक्रमक खेळू शकला नाही”, असे बजरंगच्या वडिलांनी म्हटले होते.बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले.उपांत्यपूर्व फेरीत बजरंग ०-१ ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने इराणी कुस्तीपटूला सामन्याबाहेर फेकून दिले.

किर्गिस्तानच्या पैलवानावर केली मात

बजरंगने ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या एर्नाझार अक्मातालीववर विजय मिळवला. बजरंगने एकदा किर्गिस्तानच्या कुस्तीपटूवर ३-१ अशी आघाडी घेतली. अक्मातालीने दोन गुण घेत ३-३ अशी बरोबरी साधली. बजरंगने एकसाथ २ गुण मिळवले होते. या आधारावर त्याला विजेता घोषित करण्यात आले.

भारताकडे आतापर्यंत कुस्तीमध्ये ७ ऑलिम्पिक पदके

कुस्तीपटू सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके मिळवून देण्याचा विक्रम केला होता. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रवी दहियाने रौप्यपदक जिंकले. आता बजरंगने  कांस्यपदक जिंकले आहे. त्यामुे  भारताच्या खात्यात कुस्तीत ७ पदके झाली आहेत.

रवी आणि सुशील व्यतिरिक्त, योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये कांस्य, साक्षी मलिकने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिले कुस्तीपटू होते. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here