पुणे : पुण्यात एका बंद घरामध्ये एका वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्यामुळे मृतदेह अक्षरश: सडलेले होते.पुण्यातील शिवाजीनगर गावठाण परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सायंकाळी या दोघांचे मृतदेह आढळून आले. संभाजी बापू शिंदे (वय 75), शोभा संभाजी शिंदे (वय 70) असं मृत दाम्पत्याचे नाव आहे.हे वृद्ध दाम्पत्य गावठाण परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. शिंदे दाम्पत्याला मुलबाळ काही नव्हतं. दोघेही एकटेच राहत असल्यामुळे त्यांचे नातेवाईक हे अधूनमधून त्यांची चौकशी करण्यासाठी येत असत. मृत वृद्ध महिलेच्या बहिणीची मुलगी शोभा ही दोघांची विचारपूस करण्यासाठी येत होती. पण, अलीकडेच पुण्यात कडक लॉकडाउन घेण्यात आला होता. त्यामुळे तिलाही घरी येता आले नाही.घरी फोन करूनही गेल्या काही दिवसांपासून शिंदे दाम्पत्यांशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे जेवणाचा डब्बा घेऊन शोभा घरी पोहोचली असता घराचे दार बंद होते. दार वाजवूनही शिंदे दाम्पत्य उघडायला तयार नव्हते. त्यामुळे शोभा यांनी शेजारी राहणार्यांना बोलावले आणि दरवाजा तोडला, तेव्हा शिंदे दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. या दोघांचाही मृत हा पाच-सहा दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नेमका दोघांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण शवविच्छेदनावरुनच स्पष्ट होईल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
