उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याचा घेतला बदला; लेकानं जन्मदात्या बापाचा केला खेळ खल्लास

0
89

खेड : खेड तालुक्यातील दावडी याठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या बापाच्या डोक्यात लोंखडी घण घालून हत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील दारू पिऊन येतात, विनाकारण शिवीगाळ करत मारहाण  करतात, या रागातून लेकानं आपल्या जन्मदात्या बापाची हत्याकेली आहे. ही घटना समोर आल्यानंतर दावडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं  आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

संतोष वाघिरे असं हत्या झालेल्या 43 वर्षीय वडिलांचं नाव आहे. दावडी गावच्या हद्दीतील कान्हुरमळा येथे मयत संतोष वाघिरे आपल्या 16 वर्षीय लहान मुलासोबत राहत होते. त्यांच्या म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे. तर वाघिरे यांना दारूच व्यसन होतं. मागील बऱ्याच वर्षांपासून ते दारूच्या आहारी गेले होते. ते दररोज रात्री दारू पिऊन घरी येत असत अन् आपल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ आणि मारहाण करत असत.दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी मंगळवारी मृत वाघिरे यांनी आपल्या 16 वर्षीय मुलासोबत कुरापती काढून त्याला दिवसभर शिवीगाळ आणि मारहाण केली. हे कमी होतं म्हणून की काय मृत वाघिरे यांनी आपल्या मुलाला रात्री जेवायला न देता, गोठ्यात झोपायला भाग पाडलं. एवढंच नव्हे तर अंथरून-पांघरून देखील दिलं नाही.उपाशी पोटी गोठ्यात झोपल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलानं रात्री अकराच्या सुमारास गोठ्यातील लोखंडी घणने आपल्या वडिलांच्या डोक्यात घाव घातला. हा घाव इतका गंभीर होता की, वडील संतोष वाघिरे रक्ताच्या थारोळ्यात पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला. तसेच आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिसांनी मोठा भाऊ आदिनाथ संतोश वाघिरे (वय -20 ) याच्या फिर्यादीवरून लहान भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here