शिवरायांच्या वंशजांनी इतर समाजासाठी सुद्धा काम करावे, ओबीसी समाजाच्या नेत्याचा टोला

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई :  मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्याबद्दल काही मराठा समाजाचे नेते म्हणत आहे, असा प्रस्ताव दिला तर ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही. असं जर झाले तर याविरोधात उग्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली आहे. तसंच, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी फक्त मराठा समाजासाठी न झटता सर्व समाजासाठी काम करावे, असा टोलाही शेंडगे यांनी लगावला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर OBC आणि  VJNT संघर्ष समितीकडून आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत  प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.’मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे काही ही मागणी केली तर सरकार लगेच त्यांना प्रतिसाद देते. राज्य सरकार जर मराठा समाजाला आमच्यापेक्षा वेगळं 13 टक्के आरक्षण देणार असेल तर त्याला आमची हरकत नाही. पण जर ओबीसी आरक्षणाला हात लावला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच शेंडगे यांनी दिला.

‘जो न्याय मराठा समाजाला देत आहे. तो न्याय ओबीसी  समाजाला दिला जात नाही. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती आली म्हणून आमच्या वाट्यातील आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. तो आम्ही हाणून पाडू’, असंही शेंडगे म्हणाले.

विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांच्याकडून सारथीचं अध्यक्षपद का काढून घेण्यात आले आहे. जो न्याय मराठा समाजाला तोच ओबीसींना द्या, त्यामुळे येत्या 3  नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणाच प्रकाश शेंडगे यांनी केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी फक्त मराठा समाजासाठी न झटता सर्व समाजासाठी काम करावं’, असा टोलाही प्रकाश शेंडगे यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचं नाव न घेता लगावला.

‘मराठा समाजाच्या काही नेत्यांनी नोकर भरती, एमपीएससीच्या परीक्षा बंद पाडल्या आहे. महाविद्यालयीन प्रवेश बंद पाडले आहे,  त्यामुळे नेमकं सरकार कोण चालवत आहे?’ असा सवालही शेंडगे यांनी उपस्थितीत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *