आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सर्जरी करण्याची परवानगी; केंद्र सरकारची अधिसूचना प्रसिद्ध

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : मोदी सरकारने डॉक्टरांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता आयुर्वेदीक डॉक्टर्सही शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आयुर्वेदातील पीजी विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयुर्वेदीक डॉक्टर्स हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार, नाक-कान-घसा आणि दातांशी निगडीत शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. तर दुसरीकडे सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या अध्यक्षांनी सांगितलं की, आयुर्वेदाच्या संस्थांनांमध्ये अशा सर्जरी गेल्या 25 वर्षांपासून केल्या जात आहेत. अधिसूचनेत केवळ हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, अशा शस्त्रक्रिया करणं वैध असणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार, आयुर्वेदाच्या पीजी अभ्यासात आता शस्त्रक्रियांचा अभ्यासक्रमही जोडण्यात येणार आहे. त्याचसोबत कायद्याचं नाव बदलून भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदसंशोधन विनियम, 2020 असं ठेवण्यात आलं आहे.

आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या वतीने बऱ्याच काळापासून अॅलोपथीप्रमाणे अधिकार देण्याची मागणी करण्यात येत होती. नव्या अधिसूचनेनुसार, आता आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान, शस्त्रक्रिया करण्याची प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

एकिकडे जिथे आयुर्वेदाच्या डॉक्टर्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचं मत थोडं वेगळं आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांचं म्हणणं आहे की, यामुळे डॉक्टरांमध्ये खिचडीसारखी परिस्थिती निर्माण होईल. या निर्णयामुळे देशात संमिश्र परिस्थितीमुळे हायब्रिड डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *