माझी मुलगी गेली, ती परत कधी येणार…; आईच्या आक्रोशाने सर्व गावचं हेलावलं

क्राईम ताज्या घडामोडी

नांदेड: लग्न होऊन काही दिवस सुखाचा संसार चालला पण मुल होत नसल्यामुळे पती पत्नी मध्ये वादविवाद होत होते. या वादविवादाला कंटाळून दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.  मुखेड तालुक्यातील देगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. पीडीत अनुसयाच्या आईचा आक्रोश अजुन थांबत नसून माझी मुलगी गेली, ती परत कधी येणार असं म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आईच्या या आक्रोशाने सर्व गावचं हेलावून गेलं आहे.

देगाव इथं लक्ष्मण विठ्ठल पुल्लेवाड, (वय 25) आणि अनुसया लक्ष्मण पुल्लेवाड (वय 24)  यांचे तीन वर्षापुर्वी अगदी थाटामाटात लग्न पार पडले. मुंबईत  हाताला मिळेल ते काम करत दोघांचाही अगदी  सुखाने संसार चालला होता. पण काही दिवस सुखाचे गेल्यानंतर मुल होत नसल्यामुळे दोघां पती ,पत्नीमध्ये वाद होत होते. अनेक ठिकाणी उपचार करूनही मुल होत नसल्यामुळे दोघेही तणावात वावरत होते.

त्यात लॉकडाऊन पडल्यामुळे हाताचे कामही निघून गेले. त्यामुळे ते आपल्या मुळ गावी देगाव येथे आले. गावात काही दिवस राहिल्या नंतर परत पती, पत्नीमध्ये मुल होत नसल्याच्या कारणावरून वाद सुरू झाले. या वादविवादाला ते दोघही कंटाळले होते.

आपल्याला मुल होत नाही आणि आपले वादविवाद हे आयुष्यभर असेच चालू राहणार यामुळे आपण दोघेही आपले आयुष्य संपवलेलेच बरे होईल असं ठरवून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. दोघेही पती पत्नी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शेतात गेले.

तिथे आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात काम करणाऱ्यांन जेव्हा ही घटना कळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी आता चौकशीला सुरूवात केली असून इतर काही कारणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला का याचाही तपास ते करत आहेत. लक्ष्मण आणि अनुसयाच्या कुटुंबीयांना याचा जबर धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *