पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली

क्राईम सोलापूर

सोलापूर : जिल्ह्यात वाढू लागलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. सोमवारी (ता. 20) कासेगावात (ता. दक्षिण सोलापूर) दोन पुरुष तर एक महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत असलेल्या 75 वर्षीय वृध्दाने राहत्या घरी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. 

कासेगावात राहणारे बब्रुवान गणपत काळे (वय 75) यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तिन्ही मुलांचे विवाह झाले असून मुलगी पुण्याला असते. तर दोन्ही मुले गावातील शेतात राहण्यासाठी आहेत. त्यांच्यापासून हे पती-पत्नी विभक्‍त राहत होते. दोघांचाही संसार सुखाचा सुरु होता, मात्र सोमवारी रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची रवानगी विलगीकरण केंद्रात करण्यात आली. त्यामुळे घरात एकटेच असलेल्या बब्रुवान काळे यांनी आपलीही कोरोना टेस्ट करण्याचा निश्‍चिय केला. मात्र, दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयोमानानुसार त्यांना गुडघ्याचा त्रास होता. गुडघ्याखाली त्यांच्या पायात काहीच त्राण नव्हता. मात्र, त्यांनी बायको पॉझिटिव्ह आली म्हणून आत्महत्या केली की आणखी काही कारण आहे, याचा शोध घेत असल्याचे तालुका पोलिस ठाण्यातील तपासी पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

मयत वृध्दावर सरकारी निकषानुसार अत्यंसस्कार 
कासेगावातील मृत बब्रुवान काळे यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बब्रुवान काळे हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी सांगितले. त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणण्यात आला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *