जळगाव, : पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम पतीनं मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे.
जळगाव शहरात पिंप्राळा भागातील प्रल्हाद नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पती व त्याच्या मित्राविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर पीडित महिला, तिचा पती व तीन मुले जून महिन्यांपासून आरोपी मित्राच्या घरात भाड्यानं राहात होते. आरोपी एकटाच राहात होता. नराधम पती आपल्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होता. मात्र, तसं करण्यास पीडितेचा विरोध होता.
पतीनं वाद घातला. मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यास तो जबरदस्ती करत होता. तो घराबाहेर पडला. येताना तो कोल्ड्रिक्स घेऊन आला. कोल्ड्रिक्स प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर आले. त्यातच नराधम पतीनं तिला पकडलं आणि मित्रानं तिच्यावर अत्याचार केला. नराधम पतीनं पत्नीचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि मित्रानं तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केला. नंतर याबाबत वाच्यता केल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी पतीनं आपल्या पत्नीला दिली.
धुळे येथील माहेर असलेल्या पीडित महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिचा शहरातील एका व्यावसायिकाशी विवाह झाला होता. नंतर ते जळगाव येथे राहायला आले. भाजीपाल्याच्या व्यवसाय करण्यासाठी पती- पत्नी मुलांना घेवून मित्राच्या पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात 1 मे पासून भाड्याने राहत होते. भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु असतांना 8 जून रोजी रात्री जेवणानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे सांगितले. पत्नीने असे कृत्य करण्यास नकार दिल्याने पती-पत्नी यांच्यामध्ये वाद झाला.
नंतर नराधम पतीनं पत्नीला माहेरी पाठवून दिलं. पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून पीडितेनं पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पती व त्याचा मित्र रमेश काकडे या दोघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली आहे.या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.