अश्लील शेरेबाजी करत कपडे फाडण्याचा प्रयत्न; फिरायला गेलेल्या तरुणींसोबत टोळक्याचं विकृत कृत्य

0
206

कल्याण : कल्याणनजीक असणाऱ्या मलंगगड परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींसोबत एका टोळक्यानं संतापजनक कृत्य केलं आहे. आरोपींनी दोन तरुणींवर अश्लील शेरेबाजी  करत त्यांचे कपडे फाडण्याचा  प्रयत्न केला आहे. पीडित तरुण-तरुणींनी आरोपींच्या तावडीतून कशी बशी सुटका करून घेतली. पण घरी आल्यानंतर, एका तरुणीनं हिम्मत दाखवत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत, त्यांच्यासोबत घडलेला संतापजनक प्रकार सांगितला आहे.  हा व्हिडीओ व्हायरल  झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

संबंधित घटना रविवारी सायंकाळी कल्याण परिसरातील मलंगगडाच्या पायथ्याला घडली आहे. तर पीडित तरुणी आपल्या दोन पुरुष मित्रांसोबत याठिकाणी पर्यटनाला गेल्या होत्या. दरम्यान मलंगगडच्या पायथ्याला उभ्या असणाऱ्या 6 ते 8 जणांच्या टोळक्यानं संबंधित तरुणींवर अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी दोन्ही तरुणींसह दोघा तरुणांना मारहाण देखील केली आहे.याशिवाय आरोपींनी संबंधित तरुणींनी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत त्यांचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली. यानंतर नेवाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी विविध कारणं देत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली.पण यातील एका पीडित तरुणीनं हिम्मत दाखवत सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासन जागं झालं. पोलिसांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी टोळक्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून आरोपींची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here