हैदराबाद : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आता तीन दिवस राहिले आहेत. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्यावरून सध्या राजकारणही जोरात सुरु आहे. असादुद्दीन ओवेसी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनावरून टीका केली होती. त्यानंतर आता तेलंगणा भाजपचे नेते आणि प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी ओवेसींनाच कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे.
राव म्हणाले, ओवेसी आणि कम्युनिष्ट नेते हे कायम राम मंदिराला विरोध करत आले आहेत. केवळ धर्मनिरपेक्षतेचा खोटा मुखवटा चढवून अशा विचारांच्या मंडळींनी देशात फुट पाडण्याचा कार्यक्रम केला. सहिष्णूता आणि धर्मनिरपेक्षता काय आहे हे पाहायचं असेल तर ओवेसींना कार्यक्रमाला उपस्थित राहावं. मी त्यांना निमंत्रित करतो असंही त्यांनी ते म्हणाले.
हा कार्यक्रम धार्मिक असल्याने त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाऊ नये असं मत ओवेसी यांनी व्यक्त केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑगस्टला सकाळी अयोध्येत येणार आहे. त्यामुळे सुरक्षा संस्था जास्तच अलर्ट झाल्या आहेत. 3 ते 5 ऑगस्ट या दरम्यान दहशतवादी हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुप्तचर संस्थाही सक्रीय झाल्या असून सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत.
असा असेल कार्यक्रम
3 ऑगस्ट – गणेश पूजा
4 ऑगस्ट – रामार्चन
5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत.
161 फुटांचे हे मंदिर असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे.
राम मंदिराचं गर्भगृह असलेल्या जागेवर 200 फुटांखाली ‘टाइम कॅप्सुल’मध्ये राम मंदिराचा इतिहास ठेवला जाणार असल्याचं राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janmbhumi Teerth Kshetra Trust) सदस्य कामेश्वर चौपाल यांनी म्हटलं होत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्रस्टचे महासचिव आणि प्रवक्ते चंपत राय यांनी मात्र अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
चंपत राय म्हणाले, अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नाही. तुम्ही ट्रस्टने जे अधिकृत निवेदन दिलं त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे ट्रस्टच्या सदस्यांमध्येच ताळमेळ नसल्याचं पुढे आलं आहे.