लष्कराच्या युध्दाभ्यास दरम्यान अपघात, हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारलेल्या कॅप्टनच्या मृत्यूची शंका

ताज्या घडामोडी देशविदेश

जोधपूर: भारतीय लष्कराच्या 10 पॅरा विशेष दलाच्या एका कॅप्टनचा गुरुवारी प्रशिक्षणाच्या दरम्यान झालेल्या अपघातात तलावात बुडून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लष्कराच्या एका युध्द अभ्यासाच्या दरम्यान कॅप्टन अंकित गुप्ता यांनी हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारली. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते तलावातून बाहेर आले नाहीत. पोलिसांनी एनडीआरएफ आणि पाणबूडीच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.

वाळवंटी युध्द अभ्यासासाठी भारतीय लष्कराच्या 10 पॅरा विशेष दलाचे प्रशिक्षण जोधपूर येथे सुरु आहे. त्या दरम्यान 10 पॅरा विशेष दलाचे कॅप्टन अंकित गुप्ता यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हेलिकॉप्टरमधून त्या ठिकाणी असलेल्या कायलाना तलावात उडी मारली. त्यांच्यासोबत तलावात उडी मारलेले त्यांचे इतर सहकारी बाहेर आले पण अंकित गुप्ता हे बराच उशीर झाला तरी तलावातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं एनडीआरएफशी संपर्क साधला. एनडीआरएफने बचाव अभियानाला लगेच सुरुवात केली पण रात्री उशीरापर्यंत कॅप्टन अंकित गुप्ता यांचा शोध लागला नाही. या अपघाताची जोधपूरच्या राजीव गांधी नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

लष्कराचं हे प्रशिक्षण पाण्यातील बचाव कार्याशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मधून पाण्यात उतरायचं होतं आणि बुडणाऱ्या व्यक्तीला दोरीच्या आधारे वाचवायचं अशा पध्दतीचा मॉक ड्रिल सुरु होता. देशातील विविध ठिकाणी पूर परिस्थिती किंवा अपघाताच्या वेळी लष्कराच्या या प्रशिक्षणाचा फायदा  होतो.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराचे पॅरा कमांडो आपल्या नियमित प्रशिक्षणासाठी हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारत होते. पाण्यात उडी मारल्यानंतर तातडीनं बाहेर यायचं होतं. कॅप्टन अंकित गुप्ता यांनी आपल्या इतर चार सहकाऱ्यांसोबत हेलिकॉप्टरमधून बाहेर उडी मारली. त्यानंतर त्यांचे सहकारी बाहेर आले पण अंकित गुप्ता बाहेर आले नाहीत.

रात्री उशीरापर्यंत शोध लागला नसल्याने कॅप्टन अंकित गुप्ता यांचा बुडून मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *