काश्मीरमध्ये चकमकीत, 10 तासात सुरक्षा दलांनी केला 4 जणांचा खात्मा

ताज्या घडामोडी देशविदेश

श्रीनगर 10 ऑक्टोबर: जम्‍मू कश्‍मीर च्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला (Indian Security Forces) यश मिळालं आहे. तर गेल्या 10 तासांमध्ये काश्मीरमध्ये 2 चकमकी झाल्या असून त्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे.

पुलवामा जवळच्या डडूरा गांवात दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सर्च ऑपरेशन राबवून त्यांना ठार केलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्यात अत्याधूनिक रायफल्सचाही समावेश आहे. गेल्या 10 तासांमधली ही दुसरी चकमक आहे.

या आधी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.  एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी त्या घराला वेढा दिला आणि दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं.

त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात दोनही दहशतवादी ठार झाले. दरम्यान, दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून आलेल्या शस्त्रांचा साठही सुरक्षा दलांनी जप्त केला आहे. त्यात 4 अत्याधुनिक AK-47 रायफल्स आणि प्रचंड मोठा काडतुसांचा साठा होता.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये ड्रोन्सच्या साह्याने पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पाठवत आहे. असे अनेक ड्रोन्स आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. बर्फवृष्टीमुळे छुपे मार्ग बंद होणार असून त्या आधी दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची योजना पाकिस्तान आखत आहे.

मात्र पाकिस्तानचे सर्व डाव सुरक्षा दलांनी उधळून लावले आहेत. दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई करून अनेक मोऱ्हक्यांना टिपण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. सुरक्षा दलांनी पोलिसांच्या मदतीने मोठं अभियान हाती घेतलं असून तरुणांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *