शेतकऱ्यांसाठी शेवटचं आंदोलन दिल्लीत करणार, अण्णांचा मोदी सरकारला इशारा

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

अहमदनगर : कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020)शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद (Bharat band) पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna hazare) यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.

दिदिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णांनी राळेगणमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवशीय उपोषण सुरू केले आहे.

केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केला.

या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले नाही, तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये करेल, असा इशाराही अण्णांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.

यावेळी  माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार, पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा हमी भाव दिला पाहिजे. ही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी एकदा दिल्लीत तर एकदा राळेगणसिद्धीत आंदोलन केले होते. दोन्ही वेळेस केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही स्वामिनाथन आयोगानुसार शेती मालाला हमीभाव व कृषी मुल्य आयोगाला स्वायत्तता मिळालेली नाही, असा आरोप यावेळी अण्णांनी केंद्र सरकार केला.

जालन्यात मोफत दूध वाटून स्वाभिमानीकडून भारत बंदला पाठिंबा

दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून पाठिंबा देण्यात आला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेने सुरू आहे. या आंदोलनास महाराष्ट्रातूनही शांततेत सहभागी होण्याचे आव्हान राजू शेट्टी यांनी केले होते. त्यामुळे या आंदोलनाला कुठलाही गालबोट न लावता, कुठे ही अनुचित प्रकार न करता आणि शेतमालाचा नुकसान न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आलंय.

तर नाशिकमध्ये भारत बंदमध्ये लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे लिलाव बंद असल्याने बाजार समित्यात  शुकशुकाट पसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *